सांगोला : सी.एस.आर. व टी.पी.एफ. फंड म्हणून २५ लाख रूपये तुमच्या संस्थेस मिळून देतो, असे म्हणून विश्वासात घेत ४४ लाख ९३ हजार रूपये इतकी रक्कम घेत कोणत्याही प्रकारचा फंड न देता फसवणूक करण्यात आली.
हा प्रकार १ ऑक्टोबर २०२५ पासून ३१ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत घडला. याप्रकरणी वाकी घेरडी येथील गणेश तुळशीराम कांबळे यांनी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतचे वृत्त असे, वाकी घेरडी येथील गणेश तुळशीराम कांबळे यांना सात जणांनी मिळून सांगितले की, तुमच्या संस्थेस आमच्या कंपनीकडून २५ लाखांपर्यंतचा फंड मिळवून दिला जाईल. त्यासाठी तुम्ही काही रक्कम गुंतवावी लागते, असे सांगून त्यांनी कांबळे यांचा विश्वास संपादन केला. त्यावर फिर्यादीने सुमारे ४४ लाख ९३ हजार इतकी रक्कम जमा केली.
परंतु वरील फसवणूक करणाऱ्या कंपनीकडून कसलीही रक्कम फिर्यादीस मिळाली नाही. इतकेच काय तर सदर इसमांनी सांगितलेली कोणतीही कंपनी अस्तित्वात नसल्याचे फिर्यादीच्या लक्षात आल्याने आपली फसवणूक झाली असल्याची खात्री त्यांना पटली.