सोलापूर : येथील एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, दत्ताअण्णा सुरवसे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्यासह डॉ. शरणकुमार लिंबाळे. 
सोलापूर

Sharankumar Limbale : संमेलनाध्यक्षपदी सोलापूरला चौथ्यांदा मान

य. दी. फडके, यु. म. पठाण, मारुती चित्तमपल्ली यांच्यानंतर आता डॉ. लिंबाळेंना संधी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूरचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार, समीक्षक आणि संशोधक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची सर्वानुमते निवड झाली आहे. यानिमित्ताने अध्यक्षपदाचा बहुमान सोलापूरला चौथ्यांदा मान मिळाला आहे. यापूर्वी य. दि. फडके, डॉ. यु. म.पठाण, अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांना संमेलनाध्यक्षपद मिळाले आहे.

डॉ. लिंबाळे यांचा जन्म १ जून १९५६ रोजी अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे झाला. शिवाजी विद्यापीठातून इंग्रजी विषयात बी.ए., मराठीत एम.ए. आणि मराठी दलित साहित्य आणि अमेरिकन ब्लॅक साहित्य : एक तुलनात्मक अभ्यास या विषयावर पीएच.डी. संपादन केली. व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात दूरसंचार विभागात टेलिफोन ऑपरेटर म्हणून करणाऱ्या लिंबाळे यांनी १९८६ ते १९९२ या काळात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर उद्घोषक म्हणून काम केले. पुढे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रकाशन विभागात सहाय्यक संपादक, प्राध्यापक आणि संचालक अशा महत्त्वाच्या पदांवर काम करत ते निवृत्त झाले.

अक्करमाशी ते सौंदर्यशास्त्र वैचारिक व साहित्यिक संपदा

१९८४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अक्करमाशी या आत्मकथनाने मराठी साहित्यविश्वात मोठी खळबळ आणि चर्चा घडवली. एका व्यक्तीच्या जगण्यातील संघर्षातून संपूर्ण वंचित समाजाचे वास्तव मांडणाऱ्या या पुस्तकाचे इंग्रजीत ‘द आऊटकास्ट’ या नावाने तसेच हिंदीसह अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले. या कृतीमुळे मराठी दलित साहित्याला राष्ट्रीय व जागतिक स्तरावर ओळख मिळाली.

वेगवेगळ्या भाषेत साहित्‍य अनुवादित

लिंबाळे यांचे लेखन केवळ आत्मकथनापुरते मर्यादित राहिलेले नाही. दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र या ग्रंथातून त्यांनी स्वतंत्र समीक्षात्मक मांडणी केली. साहित्याचे मोल, सामाजिक वास्तव, अनुभवांची प्रामाणिकता, मानवी वेदना आणि परिवर्तनाच्या जाणिवेत असते, हा त्यांचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेच्या विचारांवर आधारित आहे. त्यांच्या नावावर ४६ प्रकाशित साहित्यकृती असून हिंदी, इंग्रजी, मल्याळम, तमिळ, कन्नड, गुजराती आणि पंजाबी अशा विविध भाषांमध्ये त्यांचे साहित्य अनुवादित झाले आहे. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या साहित्यावर अभ्यास व संशोधन सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT