सोलापूर : तरुणाईला पोस्टाच्या आधुनिक सेवांकडे आकर्षित करण्यासाठी मुंबई पुुण्यानंतर राज्यातील तिसरे नेक्स्ट जनरेशन पोस्ट येथील गुरूनानक चौकात जेन झी इ-कट्टा नावाने शुक्रवारी (दि.९) सुरू होत आहे.
सुमारे ३०० चौरस फुटांच्या या कार्यालयाची रचना आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कॅफेच्या धर्तीवर केली आहे. तरुणांसाठी मोफत हायस्पीड वायफाय, मोबाईल चार्जिंग, एसी बैठक व्यवस्था, सेल्फी पॉइंट, डूडल व ॲनिमेटेड आर्ट तसेच इनडोअर गेम्स आणि वाचनाची सुविधा उपलब्ध असेल. सोलापूरची ओळख असलेल्या विठ्ठल व नंदीध्वजांच्या प्रतिमांचाही सेल्फी पॉइंट येथे असेल.
पार्सल पॅकिंग, ई-कॉमर्स बुकिंग, यूपीआय पेमेंट, ई-केवायसी, आधार अपडेट, आंतरराष्ट्रीय टपाल सेवा, गुंतवणूकविषयक सेवा आणि पोस्टल लाईफ इन्शुरन्स अशा सुविधा डिजिटल पद्धतीने मिळतील. क्यूआर कोड स्कॅन करून रांगेत न थांबता अनेक सेवा मोबाईलवरून पूर्ण करता येतील. बहुतांश कामे १० ते १५ मिनिटांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
टपाल दिनाचे औचित्य साधून तरुणांसाठी ही योजना सुरू केली आहे. यासाठी राज्याचे पोस्ट मास्तर जनरल प्रिती अग्रवाल येणार आहेत. तरुणांसाठी पोस्टाकडून हा वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आहे.- हेमंत खडकीकर, प्रवर अधीक्षक, मुख्य डाकघर,