सोलापूर ः सोलापूर शहर आणि परिसरात टोळीच्या माध्यमातून मारहाण, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तसेच दहशत पसरविणार्या तीन जणांच्या टोळीला सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
नवाब अ. जब्बार शेख ( वय 28)अशपाक अ. जब्बार शेख (वय 33) आणि समद ऊर्फ अल्लू मकतूम शेख (वय 39) सर्व रा. उत्तर कसबा, सोलापूर अशी तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. यांच्याविरुद्ध सन 2019, 2020 व 2025 या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून साथीदारांसह मारहाण व दमदाटी करणे, जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ दमदाटी करून सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्याने तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता. त्याअनुषंगाने पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी वरील तिघांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. तडीपार केल्यानंतर त्यांना गुलबर्गा येथे सोडण्यात आले.