Dj Ban Pudhari
सोलापूर

Solapur DJ Ban: गणेशोत्‍सवात डीजेला बंदीच

शांतता कमिटीची बैठक; युवकांकडून मागणी, ज्येष्ठांचा डीजेला विरोध

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीत यंदाच्या गणेशोत्सवात डीजे वाजविण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी (दि. २) पोलिस आयुक्‍तालयात ही बैठक झाली. यात प्रामुख्याने डीजे बंदीचा विषय गाजला.

बैठकीत काही युवक कार्यकर्त्यांनी डीजेला परवागनी देण्याची मागणी केली. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, पोलिस आयुक्‍त एम. राजकुमार यांनी त्या युवकांसोबत बैठकीनंतर चर्चा केली. यंदाचा गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी गणेश मंडळांना विविध सूचना करण्यात आल्या.

सोलापुरात गेल्या वर्षी गणेशोत्‍सवापासून डीजे बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षभरात काही अपवाद वगळता हा निर्णय यशस्‍वी झाला. मोठ्या मंडळांकडे कार्यकर्ते असल्याने ते पारंपरिक पद्धतीने लेझीमचा खेळ करीत मिरवणुका काढतात; परंतु लहान मंडळांना डीजे लावण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शासनाच्‍या नियमानुसार डीजेला परवागनी द्यावी, अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली.

यावर पोलिस आयुक्‍त एम. राजकुमार यांनी डीजे लावून कोणता आदर्श निर्माण करणार आहेत, असा प्रतिसवाल केला. त्‍यानंतर ज्येेष्ठ नेत्‍यांनी त्‍या तरुणास खाली बसण्यास सांगितले. त्‍यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला. वैभव जमादार याने सर्व जयंतीला डीजे लागले, केवळ गणेशोत्‍सवालाच डीजे बंदी का, असा सवाल केला. त्‍यावरही पोलिस आयुक्‍तांनी उत्तर देत डीजे बंदीबाबतच्या निर्णयाची माहिती दिली.

सोलापुरातील काही तरुणांनी कर्ज काढून डीजे सिस्‍टिम घेतल्या. आता डीजे बंदी केल्यास त्‍यांचा रोजगार हिरावला जाईल असा मुद्दा काही तरुणांनी मांडला. त्‍यामुळे या बैठकीत डीजे असोसिएशनने तरुणांना पाठविले आहे का अशी चर्चा रंगली होती. बैठकीत उपायुक्‍त वृष्टी जैन, प्रितम यावलकर, डॉ.आश्विनी पाटील यांच्‍यासह पोलिस अधिकारी तसेच सबंधित विभागाचे अधिकारी, महामंडळाचे ट्रस्‍टी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्‍थित होते.

नऊ मध्यवर्ती महामंडळे, १ हजार १४७ सार्वजनिक गणेश मंडळे

सोलापूर शहरात दरवर्षी सुमारे अडीच लाख घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होते. गेल्या वर्षी शहरातील नऊ मध्यवर्ती गणेश महामंडळांच्या अखत्यारित १ हजार १४७ मंडळे होती. त्यापैकी १९५ मंडळांनी विसर्जन मिरवणुका काढल्या, तर ६८ मंडळांच्या स्वतंत्र मिरवणुका झाल्या. शहरातील २५५ मंडळांनी मंडपातच श्री गणेशाचे विसर्जन केले तर ५८१ मंडळांनी छोट्या व मोठ्या वाहनांचा वापर करून विविध ठिकाणी श्रीगणेशाचे विसर्जन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT