सोलापूर

Solapur Ganesh Visarjan: उत्सुकता गणेश विसर्जन मिरवणुकीची

आज गणरायाला निरोप; लेजीम, ढोल-ताशांच्‍या निनादात डीजेमुक्त मिरवणुका

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूरने राज्यासमोर आदर्श घालून दिलेल्या ‘डीजेमुक्त’ गणेशोत्सवाची आज शुक्रवारी सांगता होत आहे. गेल्या वर्षापासून सोलापुरात सुरू झालेल्या डीजेमुक्त गणेशोत्सवाच्या संकल्पनेला यंदाही गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिव्यवस्थेला फाटा देत पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशा, हलगी आणि लेजीमच्या तालावर गणरायाला निरोप देण्याची तयारी मंडळांनी केली आहे. सोलापूरचा हा डीजेमुक्त गणेशोत्सवाचा पॅटर्न आता संपूर्ण राज्यात चर्चेचा आणि प्रेरणेचा विषय ठरला आहे. आज उत्सुकता आहे ती पारंपरिक वाद्यांच्या निनादात निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकांची.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात यंदा सुमारे पाच लाख घरगुती गणेशमूर्तींची, तर पाच हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गेल्या ११ दिवसांपासून भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता आज विसर्जन मिरवणुकांनी होणार आहे. त्यासाठी मंडळांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ढोल-ताशांच्या गजराबरोबरच हलगीचा निनाद, लेजीमचे बहारदार खेळ आणि विविध पारंपरिक कला सादर करून गणरायाला निरोप देण्याची तयारी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

९ मध्यवर्ती महामंडळांच्‍या मिरवणुका

सोलापूर शहरातील नऊ मध्यवर्ती महामंडळांच्या माध्यमातून २०० हून अधिक मंडळांच्‍या मिरवणुका निघणार आहेत. लेजीमचा बहारदार खेळ तसेच ढोल-ताशा, टिपरी, पूर्व भागातील मंडळात तेलगू गाण्यांवर केले जाणारे नृत्‍य, झांज अशा वेगवेगळ्या खेळ व नृत्‍यांनी या मिरवणुकांत रंगत असणार आहे. शहरातील मुख्य तीन तलाव तसेच इतर चार ठिकाणी गणेश विसर्जन होणार आहे. यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्हा पोलिस दलाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात सुमारे दोन हजार, तर जिल्ह्यात सुमारे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. मिरवणुकीचे मार्ग, प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे आणि विसर्जनस्थळांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. वाहतूक सुरळीत राहावी आणि मिरवणुकांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT