ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेस रविवारपासून प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर थोबडे वाड्यात शनिवारी पालखीतील मूर्तीची विधिवत पूजाअर्चा थोबडे परिवाराकडून करण्यात आली.  Pudhari Photo
सोलापूर

सोलापूरची गड्डा यात्रा आजपासून

नंदीध्वजांची आज तब्बल 17 किलोमीटर नगरप्रदिक्षणा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शुभ्र बाराबंदीतील शिवभक्त... गगनाशी स्पर्धा करणारे नंदीध्वज... हर्र बोला हर्र चा गजर... अशा उत्साहाने, चैतन्याने ओथंबलेल्या वातावरणाची निर्मिती करणार्‍या सोलापूचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या गड्डा यात्रेस आज (दि.12) पासून प्रारंभ होत आहे. श्री सिद्धरामेश्वर स्थापित 68 शिवलिंगांना रविवारी (दि.12) तैलाभिषेक करून हळद लावण्यात येणार आहे. त्यानंतर सुमारे 17 किलोमीटर अंतराची नंदीध्वजांची नगरप्रदिक्षणा सुरू होईल. यावेळी अक्षता सोहळ्याचे निमत्रंण दिले जाणार आहे. ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा सोमवारी (दि.13) सम्मती कट्ट्यावर पार पडणार आहे.

दरम्यान, शनिवारी मध्यरात्री हिरेहब्बू वाड्यात नंदीध्वजांना लोणी, हळद, चंदन लावून पाणी घालण्यात आले. त्यानंतर नंदीध्वजांना घोंगडी गुंडाळण्यात आले. त्यानंतर नंदीध्वजास हरडे, पाटलीने सजविण्यात आले. मानाच्या पहिल्या व दुसर्‍या नंदीध्वजास साज चढविण्यात आले. त्यानंतर हिरेहब्बू वाड्यातील शिवलिंगास नैवेद्य दाखविण्यात आले. रविवारी मानाच्या सातही नंदीध्वजांची शाही मिरवणूक निघणार आहे.

आज (दि.12) सकाळी साडे आठ वाजता हिरेहब्बू वाड्यापासून नंदीध्वजांची शाही मिरवणूक निघणार आहे. सकाळी 11 वाजता नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिरात आल्यानतर योगदंडाच्या साक्षीने अमृतलिंगास तैलाभिषेक घालण्यात येईल. त्यानंतर मानाचे विडे देऊन उर्वरित शिवलिंगास तैलाभिषेक करण्यासाठी नंदिध्वज मार्गस्थ होणार आहेत. दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी (दि. 13) सकाळी आठ वाजता हिरेहब्बू वाड्यातून योगदंडासह नंदीध्वजांची मिरवणूक निघणार आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिर परिसरातील उमामहेश्वर लिंग, सम्मती कट्याजवळ योगदंड आणि कुंभार कन्येचा प्रतीकात्मक विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर 68 शिवलिंगांना तैलाभिषेक करून नंदिध्वज मिरवणुकीने रात्री उशिरा हिरेहब्बू वाड्यात दाखल होतील.

मंगळवारी (दि.14) होम मैदानावर होम प्रदीपन सोहळा होईल. मानाच्या पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधून शाही मिरवणूक निघणार आहे. रात्री 9 वाजता होम प्रदीपन आणि भाकणूक सोहळा होर्ईल. बुधवारी (दि.15) रात्री नऊ वाजता शोभेचा दारूकाम आणि टुडीशोमधून सिद्धेश्वर गुरुभेट सोहळा सादर केला जाईल. गुरुवारी (दि.16) नंदीध्वज वस्त्र विसर्जनाने यात्रेतील धार्मिक विधींची सांगता होणार आहे.

भक्तिभावाचा सोहळा

श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी 12 व्या शतकात कुंभार कन्येशी आपल्या हातातील योगदंडाशी विवाह लावून दिला. त्यावेळी श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी अक्षता सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी 68 शिवलिंगांना प्रदक्षिणा घातल्या. साडे नऊशे वर्षानंतरही त्याच रूढी, प्रथा, पंरपरेनूसार तो प्रतीकात्मक अक्षता सोहळा आजही भक्तिभावाने पार पाडला जातो.

सामाजिक समरसतेचे प्रतीक

नंदीध्वज हा श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचे प्रतीक आहे. परंपरेप्रमाणे मानाचे सात नंदीध्वज असून, या यात्रेतून सामाजिक समरसतेची शिकवण दर्शविते. पहिल्या नंदीध्वजाचे मानकरी म्हणून हिरेहब्बू यांचा मान असून दुसरा मान कसब्यातील देशमुखांचा, तिसरा लिंगायत माळी समाजाचा, चौथा व पाचवा विश्वब्राह्मण समाजाचा, सहावा व सातवा मातंग समाजाचा मान असतो. अशापद्धतीने यात्रेत विविध समाजातील, जातिधर्मातील घटकांना मान असल्याने यात्रेतील सात नंदीध्वज म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे व सामाजिक समरसतेचे प्रतीक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT