सोलापूर : वांगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील एका युवकाने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या मित्राचा मृत्यू सहन न झाल्याने दुसऱ्या दिवशी एका युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवलेे. वांगीसारख्या लहान गावात चोवीस तासांत दोघा तरुण मित्रांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने वांगीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गोरख दत्तात्रय भोई (वय 27, रा. वांगी) व सुरेश दत्ता भोई (वय 21, रा. वांगी) अशी आत्महत्या केलेल्या दोन मित्रांची नावे आहेत. शुक्रवारी (दि. 21) गावातच आपल्या स्वतःच्या राहत्या घरातील पत्र्याच्या वाशेला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. नातेवाईक व मित्रांनी त्याला शासकीय रूग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. गोरखच्या पश्चात आई, वडील, पत्नीसह मुलगी आहे. दरम्यान, गोरखने आत्महत्या केल्याचे दुख अनावर झाल्याने त्याचा मित्र सुरेश भोई याने दुसऱ्याच दिवशी सायंकाळी सात वाजता एका शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन जीवन संपवलेे.या घटनेने वांगी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मित्राच्या अंत्यसंस्कारला जाणे टाळले
गोरख भोई या आपल्या मित्राने आत्महत्या केल्यानंतर सुरेश भोई याने आपल्या आईला अंत्यसंस्कारला जाणार नसल्याचे सांगितले. गोरखचा मृतदेह मला पाहवणार नाही. त्यांनी मला न सांगता असा टोकाचा निर्णय घेतला. असे दुख व्यक्त करीत त्याने आईला अंत्यसंस्काराला पाठविले.