सोलापूर : शासकीय रुग्णालयातील नवीन बी ब्लॉक या इमारतीच्या तळमजल्यात असलेल्या आर्थोपेडीक विभागाच्या बाजूला हृदयरोग विभाग सुरू होत आहे. येथे हृदयविकारावरील उपचारासाठी कॅथलॅबचे काम सध्या वेगाने सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे एकाच छताखाली येथे रूग्णांवर उपचार करता येणार आहे.
कारण, अत्यवस्थ रुग्णांवरील उपचाराचा विभागही जवळच होत असून याशिवाय हृदय रूग्णांच तपासणी केली जाणारी प्रयोगशाळाही येथेच केले जात आहे. याचे लोकार्पण झाल्यावर शहर, जिल्ह्यातील गरीब रूग्णांवर हृदयरोगावरील उपचारासाठी येणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चाची चिंता आता मिटणार आहे.
हृदय रूग्णांवर सध्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून विविध खासगी रूग्णालयात उपचार केले जाते. मात्र, या रूग्णालयाकडून अन्य तपासणीच्या नावाखाली काही प्रमाणात पैसे घेतात. येथील कॅथलॅब अत्याधुनिक तंत्रज्ञानाने प्रगत आहे. शिवाय, इन अडव्हॉन्स उपचारही येथे केले जाईल. दहा बेडसह ऑपरेशन थिएटर उभारण्यात येत असून सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या दीड महिन्यात या कॅथलॅबचे लोकार्पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे लोकार्पण झाल्यावर शहर जिल्ह्यातील हृदयरोगाने त्रस्त असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार होईल. जिल्हा रूग्णालयानंतर ही दुसऱ्या शासकीय संस्थेत कॅथलॅब सुरू होत आहे. या दोनही कॅथलॅबच्या माध्यमातून गरीब रुग्णांवर एक रूपयाही खर्च न करता त्यांच्यावर उपचार करता येईल.
हृदय रूग्णांवर ऑपरेशन करताना लागणारी विविध यंत्रसामुग्री बसवली जात आहे. यंत्रसामुग्री बसवण्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. याचे लोकार्पणही दीड महिन्यात होईल. हृदय रूग्णांवर उपचारासाठी येणाऱ्या लाखो रूपयांच्या खर्चाची चिंता यापुढील काळात सामान्य कुटुंबांतील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची ती मिटली आहे.