सोलापूर : राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तब्बल चार हजार ५४२ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३६८ शेतकऱ्यांचे चार कोटी एक लाख २६८ रुपये कर्ज माफ झाले. इतर राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांचे कर्जदार शेतकऱ्यांचेही कर्ज शासनाकडून माफ करण्यात आले आहे.
दरम्यान, पात्र शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. कर्जमाफी योजनेच्या यादीत नाव असलेल्या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी ई- केवायसी केल्याशिवाय त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेसाठी जिल्ह्यातील चार हजार ५४२ शेतकरी पात्र ठरले. संबधीत शेतकऱ्यांनी ई-केवायसी तत्काळ पूर्ण करुन कर्जमाफीचा लाभ घ्यावा.- मुकुंद पवार, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर