सोलापूर : सोलापुरात घरफोडी करणाऱ्या चार सराईत चोरट्यांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले असून रोख रक्कम, सोन्याचा दागिना, चारचाकी गाडीसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील दोन चोरट्यांवर इतर जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.
शहर गुन्हे शाखेचे व. पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी वाढत्या घरफोडींच्या पार्श्वभूमीवर पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या. सहा. पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथक न्यू बुधवार पेठेतील घरफोडीचा तपास करताना हा सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे गुन्हा सराईत गुन्हेगारांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पुणे येथे जावून चार सराईत आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.
दिपक बाळू ढेरंगे (वय 34, रा. कोरेगाव भिमा, शिरुर, पुणे), दत्ता अरुण कदम (वय 38, रा. नऱ्हे, हवेली, पुणे), आकाश सुर्यकांत आंग्रे (वय 29, रा. बिबवेवाडी, पुणे) आणि साहेबराव लक्ष्मण बेंडुरे (वय 53, रा. दहिसर वेस्ट, मुंबई) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांनी कारमधून सोलापूरला येऊन दोन घरफोडी केल्याचे कबूल केले.
त्यांच्याकडून रोख 15 हजार रुपये, सोन्याचा दागिना, चारचाकी गाडी असा एकूण चार लाख 95 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला. सदरची कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमारा, पोलिस उपायुक्त डॉ. आश्विनी पाटील, सहा. पोलिस आयुक्त राजन माने, व. पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश खेडकर, जे.व्ही. गवळे, संदिप जावळे, विनोद रजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, दिपक जाधव, मंजूनाथ मुत्तमवार, राजेश मोरे, अजय गुंड, बाळासाहेब काळे, सतिश काटे यांनी पार पाडली.