Child Marriage Pudhari
सोलापूर

Child marriage cases: सोलापुरात चार बालविवाह उघडकीस

महिला बालकल्याण विभागाकडून संबंधितांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहरात वेगवेगळ्या भागात चार बालविवाह झाल्याचे उघडकीस आले. यात चारही अल्पवयीन तरुणी या गर्भवती राहिल्या आहेत. महिला बालकल्याण विभागाने मुलीच्या माता-पित्यासह सासरच्या व्यक्तींवर, संबंधित हॉस्पिटलवर गुन्हा दाखल केला आहे.

जुने विडी घरकूल येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात आला. ती गर्भवती राहून तिच्यावर मार्कंडेय हॉस्पिटल येथे उपचार केले. तिची सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात प्रसूती झाली. या दोन्ही हॉस्पिटलनी मुलगी अल्पवयीन असल्याचे पोलिसांना कळवले नाही. याबाबत दोन्ही हॉस्पटलचे तत्कालिक डॉक्टर, मुलीचे आईवडील, पती, सास यांच्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या घटनेत अशोक चौकात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विवाह कोल्हापूर येथे लावून देण्यात आला. ती गर्भवती झाल्यानंतर सोलापुरातील स्पॅन हॉस्पिटल व भावनाऋषी हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आले. याची माहिती मिळताच महिला बालकल्याण विभागाने पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दोन्ही रुग्णालयातील तत्कालिन डॉक्टर, मुलीचे आईवडील, पती, सासरे, सासू यांच्या विरोधात जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिसऱ्या घटनेत जुना विडी घरकूल येथील मुलीचा बालविवाह तेथीलच रहिवासी असलेल्या एका तरुणासोबत लावण्यात आला. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर गुंजोटीकर हॉस्पिटल येथे उपचार घेतले. याची माहिती मिळताच महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांनी तक्रार दिली. त्यानुसार मुलीचे माता पिता, रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी, पती, सासरा, सासू यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौथ्या घटनेत रमाबाई आंबेडकर नगर येथील अल्पवयीन मुलीचे गल्लीतील तरुणासोबत लग्न लावण्यात आले. त्यातून ती गर्भवती राहिली तिच्यावर साबळे हॉस्पिटल व शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. महिला बालकल्याण अधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानुसार दोन्ही हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी, मुलीचे आईवडील तसेच पती, सासू, सासरे , दीर यांच्या विरोधात जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT