सोलापूर : जिल्ह्यातील चार आयुष्मान आरोग्य मंदिरांनी उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता मानांकन यशस्वीरित्या संपादन केले आहे. सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आतापर्यंत जिल्ह्यातील एकुण चौदा आयुष्मान आरोग्य मंदिरांना हा बहुमान मिळविला आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य संस्थांच्या दर्जा आणि सुविधांची पाहणी करून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्रदान करण्यात येते. राष्ट्रीय एनक्युएएस मूल्यांकन हे आरोग्य सेवेतील गुणवत्ता, रुग्णकेंद्रित सेवा, सुरक्षितता, स्वच्छता, व्यवस्थापन आणि प्रभावी सेवा वितरण यांचे राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च मानांकन मानले जाते.
मानांकन प्राप्त आयुष्मान आरोग्य मंदिरे
१) आयुष्मान आरोग्य मंदिर, विजोरी (८६.९२%)
२) आयुष्मान आरोग्य मंदिर श्रीपत पिंपरी – (८४.३६%)
३) आयुष्मान आरोग्य मंदिर, लिंबिचिचोळी (८०%)
४) आयुष्मान आरोग्य मंदिर- रातंजन (८४.९३%)
या मानांकनामुळे उपकेंद्र स्तरावर रुग्णकेंद्रित, सुरक्षित, संसर्गमुक्त आणि दर्जेदार आरोग्यसेवा बळकट होण्यास मदत होईल. आरोग्य केंद्रांमधील सेवा वितरण, रुग्ण सुरक्षा, औषध व आधुनिक उपकरण व्यवस्थापन, नोंदवही व्यवस्थापन तसेच रुग्णांच्या समाधानात सातत्याने वाढ होईल. मानांकन प्राप्त संस्थांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विशेष प्रोत्साहन निधी मिळण्यास पात्र होते.
आजपर्यंत जिल्ह्यातील १४ आरोग्य संस्थांना गुणवत्तेचे मानांकन प्राप्त झाले. आणखी सर्व आरोग्य संस्थेचे एनक्युएएस मानांकन प्राप्त करण्याचा मानस असून दर्जेदार व सुरक्षित आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न राहील- कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., सोलापूर.
अथक प्रयत्नांमुळे शक्य
पालकमंत्री जयकुमार गोरे, जि.प.अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आरोग्य सभापती चेतनसिह केदार सावंत, समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला समितीचे सभापती अमृता वाघे, उपसांचलक डॉ भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहायक संचालक डॉ. मोहन शेगर आणि जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, जिल्हा समन्वयक निखिल फताटे व टीमच्या अथक प्रयत्न, कार्य व सक्षम नेतृत्वामुळे हे यश प्राप्त करणे शक्य झाले आहे.