सोलापूर : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वरील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यान उन्नत मार्ग (उड्डाण पूल) प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प घोषित करण्यात आला आहे. त्यासाठी आता दहा शासकीय विभागांच्या ६३ हजार ९४९.९८ चौ.मी. या शासकीय जमिनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास हस्तांतरित करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे निविदेचा मार्ग मोकळा झाला आहे.
उन्नत मार्ग हा शहरातील, आंतरराज्य वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. वाहनांच्या प्रवासास विलंब होत अपघातांचा धोका वाढला आहे. तसेच, शहरातील प्रदुषणातही वाढ होत असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण होत आहे.
या प्रल्पांसाठी शासकीय जागांचा विनामूल्य आणि आगाऊ ताबा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिला जात आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यांत निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. याबाबतचे शासकीय निर्णय ११ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला आहे.
बाधित शासकीय विभाग व क्षेत्रफळ (चौ.मी.मध्ये)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ - ६७५०.६६
राज्य उत्पादन शुल्क विभाग - १८८४.७३
जिल्हा दुग्ध व्यवसाय - २५५१.४
सार्वजनिक बांधकाम विभाग - २२६३.२९
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्या - ८९६.८३
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या - ७०४५.७९
पोलिस आयुक्त सोलापूर शहर - ४४८६.७२
पोलिस अधीक्षक ग्रामीण - १०६४.८४
डॉ. व्ही. एस. मेडिकल कॉलेज, सोलापूर - ७४४.३१
जिल्हाधिकारी सोलापूर - ३६२६१.४१
एकूण - ६३९४९.९८
प्रकल्पाचे वैशिष्ट्ये
प्रकल्पाची लांबी - ९.६६० कि.मी. लांबीचा चार पदरी उन्नत मार्ग, रॅम्प - ६, छोटे पूल - ३, प्रकल्प किंमत - १०२०.५० कोटी रुपये