दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात सीना नदीच्या पुरानंतर आणि अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर गावे पुन्हा पूर्व पदावर येत आहेत. या कामी प्रशासनही जोमाने कामाला लागल्याचेे दिसून येत आहे.
दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाकडून 329 लाभार्थ्यांना दहा हजार रुपयांचा लाभ देण्यात आला असल्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी सांगितले. अप्पर तहसील कार्यालय मंद्रुपकडे 2750 लाभार्थी आहेत, यापैकी 1900 लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली असून उर्वरित लाभार्थ्यांच्या बँक खात्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे रक्कम जमा होणे बाकी आहे.
15 गावातील अतिवृष्टीने, पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना अन्नधान्यांचे किट, कपडे, चादरी आदी साहित्य देण्यात आल्याचे मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयाचे तहसीलदार सुजित नरहरे यांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या वतीने बाधित गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या सहकार्याने जंतुनाशक फवारणी, आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीलिमा घोगरे यांनी सांगितले. बाधित गावातील 14 हजार जनावरांना फर्या आणि घटसर्प लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आत्तापर्यंत 2 हजार जनावरांना लसीकरण करण्यात असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. रणजीत जाधवर यांनी दिली.
बाधित गावात कर्मचारी आणि एजन्सीच्या माध्यमातून वीज पुरवठा चालू करण्यात आला आहे. अद्यापही काही ठिकाणी पाणी असलेल्या कारणाने मदत कार्य त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी शेतातील पोल उभे करण्याचे कामे प्रलंबित आहेत. वडकबाळ सबस्टेशन पूर्णपणे पाण्याखाली गेला होता, तो पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. औराद येथेही वीजपुरवठा सुरळीत चालू करण्यात आला आहे, मात्र 33 केव्ही सब स्टेशनचे काम प्रगतिपथावर असल्याचे महावितरणचे उपअभियंता सचिन दवंडे यांनी सांगितले.
खरडून गेलेल्या जमिनींचे पंचनामे सुरू
सीना नदी काठाच्या पुराने बाधित शेतकर्यांची ज्यांची जमीन खरडून गेली आहे ज्यांच्या शेतात गाळ साचला आहे. त्याचे पंचनामे सुरू असून आठवडा अखेरीस पूर्ण होतील. खरीप पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, पुरामुळे बाधित फळबागांचे देखील पंचनाम्याचा यात समावेश करण्यात आला असल्याचे तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांनी सांगितले.