कुर्डूवाडी : लव्हे (ता. माढा) या सीना नदी काठावरील गावाला सीना नदीला आलेल्या पुराने वेढा घातल्याने 400 पेक्षा जास्त लोकांना बोटीद्वारे सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यात आले. घरातील कुठल्याही वस्तू न घेता अंगाच्या कपड्यानिशी हे लोक बाहेर आले.
आजपर्यंतच्या इतिहासात सीना नदीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधीही महापूर आला नव्हता. लव्हे ते लोहारा (ता. परंडा) या गावाला जोडणारा मोठा पूलही पाच फूट पाण्याखाली गेला आहे. रविवारी नगर व आष्टी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे पाणी आले. त्यामुळे प्रथम कव्हे येथील बंदरा फुटला. सीना काठावरील वाघेगव्हाण (ता.परंडा) व त्याच्या लगत असलेल्या माढा तालुक्यातील लव्हे गावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसू लागला आहे .
रविवारी लव्हे येथील उंच असलेल्या हनुमान मंदिराच्या पायथ्याला पाणी आले. प्रशासनाने सर्व गावातील व वाड्यावरस्त्यावरील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. सोमवारी पाणी प्रचंड वाढल्याने गावातील लोकांनी सोमवारची रात्र गावाबाहेरच काढली. मंगळवारी तर आणखीन पाण्यात वाढ झाली. यामुळे गावातील काही राहिलेल्या लोकांना बोटीतून मंगळवारी पाण्याबाहेर काढण्यात आले. यामध्ये नदीकाठावरील हजारो एकर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे तसेच अनेक जनावरे या पुरात दगावली आहेत.
पुरात बुडणार्यास वाचविले
पुरात बुडणार्या भाऊ कोळी या व्यक्तीला रोहन चव्हाण व चैतन्य चव्हाण यांनी बाहेर काढले. नागरिकांची सोय धोका मंगल कार्यालय तसेच लव्हे गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये केली आहे.