सोलापूर

Solapur News: बुजविलेले खड्डे गेले पावसात वाहून

कामाचे नाव आणि पैशाची गाठ, मोहोळ नगरपरिषदेचा अजब कारभार

पुढारी वृत्तसेवा

पोखरापूर : मोहोळ नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांमधून निकृष्ट होत असलेल्या कामाबाबत संताप व्यक्त होत आहे. त्यातच एप्रिल महिन्यात शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी लाखो रुपये खर्च करून केलेले डांबरीकरण गुरुवारी झालेल्या अवघ्या दहा मिनिटांच्या पावसात अक्षरशा वाहून गेले. केवळ नावासाठी काम करून शासनाचे लाखो रुपये पाण्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मोहोळ शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.

श्री क्षेत्र मोहोळ येथील श्री नागनाथ महाराजांची यात्रा एप्रिल महिन्यात झाली. त्या यात्रे अगोदर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतचे खड्डे डांबरीकरण करून भरण्याची मागणी नागरिकांनी केली होती. यात्रेसाठी सोलापूर जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक श्रीक्षेत्र मोहोळ येथे येत असल्याने नगरपरिषदेने हे काम चांगल्या पद्धतीने करणे अपेक्षित होते. केवळ कामाचे नाव आणि पैशाची गाठ मारण्यासाठी मोहोळ नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविले.

दरम्यान गुरुवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोहोळ शहरात अवघ्या दहा मिनिटांचा पाऊस झाला. या पावसामुळे मोहोळ शहरातील मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर खड्ड्यांमध्ये पाणी साचून अक्षरशा छोटे तळे झाले होते. दीड महिन्यापूर्वी लाखो रुपये खर्चून खड्ड्यांचे डांबरीकरण केलेले गेले कुठे? असा नागरिकांमधून या निमित्ताने संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला असून यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून तात्काळ शासनाचे पैसे पाण्यात उडविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT