करमाळा : पाच तोळे सोने व चांदीचा छल्ला चोरणाऱ्या दोन महिला चोरट्यांना करमाळा पोलिसांनी 24 तासात अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
रविता प्रशांत भोसले (रा. परंडा, जि. धाराशिव) व आशा लखन पवार (रा. महातपुरी, ता. गंगाखेड, जि. परभणी) अशी दोन महिला चोरट्यांची नावे असून त्यांना करमाळा न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुलोचना मच्छिंद्र लोहार (वय 60, रा. डोंबिवली) यांनी फिर्याद दिली. आहे. सुलोचना लोहार या त्यांचे नातुच्या लग्नाला मौजे वरकटणे (ता. करमाळा) येथे आलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्या परत आपल्या गावी निघाल्या. करमाळ्यात त्या बसमध्ये बसल्या. तिकिटाचे पैसे देतेवेळी पर्समध्ये ठेवलेले गंठण व छल्ला त्यांना दिसला नाही. बसमध्ये चढताना चोरट्याने दागिने लंपास केले होते.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत माने यांनी स्टॅन्डवरील सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाआधारे तपास सुरू केला. भोसले व पवार या महिलांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकाने नारायणगांव, जि. पुणे एसटी स्टॅन्ड परिसर, चौक, हॉटेल व लॉजेस याठिकाणी त्यांचा शोध घेत त्यांना पकडले. पुढील तपास हवालदार पांडुरंग आरकिले हे करत आहेत.
यांनी केली कारवाई
उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज अभंग, हवालदार अजित उबाळे, मनिष पवार, वैभव ठेंगल, अर्जुन गोसावी, हनुमंत भराटे, रविराज गटकुळ, अमोल रंदील, अमोल पवार, सायबर पोलिस ठाणेचे व्यंकटेश मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.