Ujani dam Pudhari File Photo
सोलापूर

Solapur Farmers Protest : उजनी धरणावर ठेचा-भाकरीसह आंदोलन

प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा स्पष्ट इशारा

पुढारी वृत्तसेवा

करमाळा : संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळीचा उत्साह, घराघरांत फराळाची धामधूम आणि आनंदाचे वातावरण असताना करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र दिवाळीचा आनंद बाजूला ठेवून आपल्या हक्काच्या लढ्यासाठी उजनी धरणावर उतरावे लागले.

दिवाळी पाडव्याच्या दिवशी सर्वत्र गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेतला जात असताना या शेतकऱ्यांनी उजनी धरण परिसरात ठेचा-भाकरी खाऊन गांधीगिरी पद्धतीने अनोखे आंदोलन केले. सणाच्या दिवशीही शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागणे, हा केवळ एका दिवसाचा विषय नसून उजनी परिसरातील शेतकरी, मच्छीमार आणि धरणग्रस्तांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणारा संदेश आहे. उजनी धरणावर प्रस्तावित असलेल्या विविध प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांनी एकत्र येत सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. विशेष म्हणजे सणासुदीच्या दिवशीही आपल्या शेती, पाणी, उपजीविका आणि भविष्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागत असल्याने या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी बोलताना भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते, जिल्हाधिकारी आणि सरकारच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. हे प्रकल्प एवढेच चांगले आणि फायदेशीर वाटत असतील, तर ते तुमच्या भागात घेऊन जा किंवा गुजरातमध्ये घेऊन जा. उजनी धरणावर हे प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला या प्रकल्पांचे फायदे सांगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आमच्या शेतकऱ्यांच्या चिंता आणि आक्षेप समजून घ्या, अशा शब्दांत कांबळे यांनी आपली भूमिका मांडली.

शेतकरी, मच्छीमार आणि धरणग्रस्तांच्या हिताचा विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली. या आंदोलनाची दखल घेऊन सरकार कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

दिवाळीचा फराळ सोडून ठेचा-भाकरीचा घास!

दिवाळी पाडव्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी ठेचा-भाकरी खाऊन आंदोलन करणे हे या लढ्याचे वेगळेपण ठरले. एकीकडे सणाचा आनंद साजरा होत असताना दुसरीकडे उजनीच्या पाण्यावर आणि परिसरातील भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. सरकारने शेतकऱ्यांच्या आक्षेपांची गांभीर्याने दखल घ्यावी, स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्यावे आणि प्रस्तावित प्रकल्पांबाबत फेरविचार करावा, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT