सोलापूर

Solapur News : चारा डेपो, छावण्यांऐवजी अनुदान द्या

शेतकऱ्यांची मागणी; मंगळवेढा-सांगोला तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांची पहाणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : चारा डेपो, छावण्यांऐवजी थेट अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुषकाळी पहाणी दौऱ्यावर आलेल्या जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडेे केली. दुष्काळी परस्थितीची पहाणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे सरसकट व अचूक करण्याचे निर्देश दिले.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी शुक्रवारी मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, कोरड्या विहिरी तसेच जनावरांसाठी उपलब्ध चाऱ्याची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व मागण्या जाणून घेतल्या. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरसकट पंचनामे करून नुकसानीची वस्तुनिष्ठ व अचूक नोंद घेण्याच्या सूचना दिल्या.

मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी, आंधळगाव, लेंडवे चिंचोळी आणि शिरसी या गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन दुष्काळी स्थितीची माहिती घेतली. लेंडवे चिंचोळी येथे टँकरद्वारे सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याची पाहणी केली. नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत आहे किंवा नाही, याची माहिती घेतली. पाण्याच्या टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे किंवा नाही, याचीही त्यांनी प्रत्यक्ष तपासणी केली.

यानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगोला तालुक्यातील विविध गावात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी केली. चाऱ्याची कमतरता निर्माण झाल्यास चाऱ्यासाठीचे अनुदानही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उपलब्ध करून द्यावे. चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरू करण्याऐवजी थेट आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT