थकीत ऊस बिलासाठी झाडावर चढून अर्धनग्‍न आंदोलन 
सोलापूर

Solapur News : थकीत ऊस बिलासाठी झाडावर चढून अर्धनग्‍न आंदोलन

‘गोकुळ’कडून दोन वर्षांपासून बिले थकीत; आज बैठकीचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्‍याकडील थकीत बिले मिळावीत, यासाठी धाराशिव, सोलापूर आणि लातूर जिल्‍ह्यांतील शेतकऱ्यांनी पूनम गेट येथील झाडावर चढून सोमवारी (दि. ७) अर्धनग्‍न आंदोलन करत बिले देण्याची मागणी केली. बिलाबाबत मंगळवारी तहसीलदारांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

सन २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये गोकुळ साखर कारखान्‍याला सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्‍ह्यांतील शेतकऱ्यांनी ऊस पाठवला होता. मात्र, कारखान्याने शेकडो शेतकऱ्यांची अडीच कोटी रुपयांची बिले थकवली. त्‍यामुळे शेतकर्‍यांनी आक्रमक होऊन चार हुतात्‍मा पुतळा ते पूनम गेटदरम्‍यान अर्धनग्‍न मोर्चा काढला. त्‍यानंतर पूनम गेट येथील झाडावर चढून आंदोलन केले. यावेळी कारखान्‍याचे चेअरमन दत्ता शिंदे यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करावा, तहसीलदारांवर कारवाई करावी, थकीत बिले तत्‍काळ द्यावीत, अशा विविध मागण्या केल्‍या. सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी आंदोलनास्‍थळी भेट देऊन शेतकऱ्यांना बिले मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्‍याविषयी मंगळवारी (दि. ८) बैठक लावण्याचे आश्वासन दिले. त्‍यानंतर शेतकर्‍यांंनी झाडावरून उतरून ठिय्या आंदोलन सुरू केले. कोणतीही अनर्थ घटना घडू नये, यासाठी अग्‍निशमन दलाची गाडी आंदोलनास्‍थळी बोलावण्यात आली होती. यावेळी अरविंद घोडके, अजित धुमाळ, संजय जेऊरे, शिवराज मुळजे, रुहुल्‍ला शेख, हणमंत बिराजदार, अभिजित सवळी, माणिकराव बनसोडे, काशीनाथ माने, शिवानंद सुरवसे आदी उपस्‍थित होते.

चेअरमनसह तहसीलदारांवर गुन्हा दाखल करा

बिले थकविल्‍यामुळे सन २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये गोकुळ साखर कारखान्‍यावर आरआरसीची कारवाई सुरू होती. त्‍यावेळी अडीच कोटी रुपयांची बिले न देताच कारवाई का थांबविली. बिले थांबविल्‍यामुळे चेअरमन दत्ता शिंदे यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करावा. तसेच, तहसीलदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांची केली. खरीप पिके पूर्णपणे वाया गेली आहे. दुष्काळी परिस्‍थिती असून शेतकऱ्यांकडील तुटपुंजी मातीत घातली आहे. त्‍यामुळे तत्‍काळ थकीत ऊस बिले मिळावीत; अन्‍यथा गंभीर परिणामाला प्रशासनाने तयारीत राहावे, असा इशारा आंदोलक नेते ॲड. अमोल पाटील यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT