Drought Pudhari
सोलापूर

Solapur Drought Relief : शेतकऱ्यांना प्रतीक्षा दुष्काळी मदतीची

८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; ९.२० लाख शेतकरी बाधित

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, पावसाचा लांबलेला खंड आणि आर्थिक संकट अशा तिहेरी संकटांचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अखेर संपली; मात्र त्यांच्या पदरी अद्याप दुष्काळी मदतीची प्रतीक्षाच आहे.

जिल्ह्यात तब्बल ८ लाख २ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, ९ लाख २० हजार ४२३ शेतकरी बाधित असल्याचे प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. जिल्हा प्रशासनाने १ हजार १६७ कोटी ४७ लाख रुपयांच्या अपेक्षित मदतीचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे.

सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांसह इतर खरीप पिकांचे नुकसान झाले. बागायती पिके आणि फळबागांनाही त्याचा फटका बसला. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पादन घटले असून, शेतीसाठी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या नुकसानीच्या संयुक्त अहवालात जिरायत, बागायत आणि फळपिकांचे स्वतंत्र पंचनामे व बाधित क्षेत्राची नोंद करण्यात आली आहे. जिरायत पिकांसाठी २६६ कोटी ६३ लाख, बागायती पिकांसाठी ६१७ कोटी ४१ लाख आणि फळपिकांसाठी २८३ कोटी ४२ लाख रुपयांच्या मदतीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

प्रशासनाने नुकसानीचा अहवाल पाठविल्यानंतर शासनस्तरावर त्याची छाननी, निधी मंजुरी आणि वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. आधीच खरीप हंगामात नुकसान झाल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत दुष्काळी मदतीला विलंब झाल्यास रब्बी हंगामाच्या नियोजनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

मदतीची रक्कम वाढणार

केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीसाठी एनडीआरएफच्या मदतीच्या दरात वाढ केली आहे. त्यानुसार प्रतिहेक्टर मदतीचे सुधारित दर पुढीलप्रमाणे- जिरायत पिके : ८,५०० रुपयांऐवजी ११,००० रुपये, बागायती पिके : १७,००० रुपयांऐवजी २२,००० रुपये, फळपिके : २२,५०० रुपयांऐवजी ३०,००० रुपये तर सध्या मदतीसाठी दोन हेक्टरची कमाल मर्यादा लागू आहे.

माढा, बार्शी, करमाळ्यात मोठे बाधित क्षेत्र

बार्शी तालुक्यात सर्वाधिक १ लाख १ हजार ४२१.८४ हेक्टर बाधित क्षेत्राची नोंद आहे. माढा तालुक्यात ८१ हजार ५१७ हेक्टर, करमाळा तालुक्यात ८२ हजार ८० हेक्टर, मोहोळमध्ये ८५ हजार २१७.२६ हेक्टर आणि अक्कलकोटमध्ये ८५ हजार ३२२.६० हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे अहवालात नमूद आहे.सांगोला तालुक्यात ७७ हजार ८६४.८९ हेक्टर, पंढरपूरमध्ये ७० हजार ४२९.०१ हेक्टर, मंगळवेढ्यात ६२ हजार ३८४.७७ हेक्टर, दक्षिण सोलापुरात ३४ हजार ७९८.३७ हेक्टर, उत्तर सोलापुरात २७ हजार ३७८.२० हेक्टर, अक्कलकोटच्या आकडेवारीनुसार ८५ हजार ३२२.६० हेक्टर, तर माळशिरस तालुक्यात ६८ हजार ४३.५४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची नोंद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT