Life Ended News 
सोलापूर

Solapur news | थकीत ऊसबिलाच्या विवंचनेत शेतकऱ्याने जीवन संपवले

दरम्यान शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे

पुढारी वृत्तसेवा

कासेगाव ( ता.द.सोलापूर) : थकीत ऊसबिल मिळत नसल्याच्या विवंचनेतून एका शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मुस्ती येथील शेतकरी रामचंद्र आप्पाशा कळके यांनी आपल्या एक एकर क्षेत्रातील सुमारे ५० टन ऊस धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्यास गाळपासाठी दिला होता. या उसाचे सुमारे १ लाख ४० हजार रुपये बिल मिळणे अपेक्षित होते. मात्र, ऊस पुरवठा करून बराच कालावधी उलटल्यानंतरही त्यांना बिलाची रक्कम मिळाली नसल्याचे सांगितले जाते.

थकीत ऊसबिल मिळावे यासाठी कळके यांनी वारंवार कारखान्याकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यातून कोणताही ठोस परिणाम झाला नसल्याने ते आर्थिक आणि मानसिक तणावाखाली होते. अखेर १८ जून रोजी त्यांनी विष प्राशन केले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, २१ जून रोजी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

या घटनेमुळे शेतकरी वर्गात संतापाची भावना निर्माण झाली आहे. उसाचे बिल निर्धारित कालावधीत अदा करण्याबाबत कायदेशीर तरतुदी असतानाही शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळत नसल्याची तक्रार व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी संघटनांनी केली आहे.

रामचंद्र कळके यांच्या पश्चात पत्नी, मुले व मुली असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच थकीत ऊसबिलाचा प्रश्न तातडीने सोडवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT