कुर्डूवाडी : बाजारपेठेत कांद्याच्या दरात झालेल्या तीव्र घसरणीचा फटका बसलेल्या लऊळ (ता. माढा) येथील कांदा उत्पादक शेतकरी खजोद्दीन बबन पठाण यांनी तब्बल चार एकरांवरील कांद्याचे पीक नांगरून टाकल्याची घटना समोर आली आहे.
यावर्षी कांद्याचे उत्पादन चांगले झाले असले तरी बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि पाणीपुरवठा यासाठी मोठा खर्च करूनही बाजारात कांद्याला मिळणारा दर अत्यंत कमी असल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित संतप्त शेतकऱ्याने शेतातील उभे असलेले कांद्याचे पीक ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरून टाकले. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी माढा तालुक्यातील कांदा उत्पादक व शेतकरी संघटनेकडून होत आहे.