सोलापूर

Solapur: आमचे घर आम्हाला द्या म्हणत ओतून घेतले डिझेल

महापालिका आवारात घडला प्रकार; अतिरिक्त आयुक्तांनी शमवले प्रकरण

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : आम्हाला राहायला घर नाही, आम्ही बेघर झालेलो आहोत, आमचं घर आम्हाला द्या, असे म्हणत अतिक्रमित जागेवर केलेले अतिक्रमण काढल्यानंतर संतप्त कुटुंबाने महापालिका आवारात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला; परंतु सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवलेच, पण नुकताच पदभार घेतलेल्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी संबंधित कुटुंबीयाची समजूत काढत प्रकरण वेळीच शमवले.

पाथरूट चौक परिसरातील सुमारे १५ ते १६ कुटुंबांची घरे अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पाडण्यात आली. या कारवाईनंतर संबंधित कुटुंबे बेघर झाली. त्यांच्यासमोर निवारा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे या कुटुंबांचे म्हणणे आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून न्यायासाठी संघर्ष करीत आहेत, असे युवा भीम सेनेचे म्हणणे आहे. अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे निवेदने देऊन पर्यायी जागा व तात्पुरत्या निवाऱ्याची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने संतप्त कुटुंबीयांनी गुरुवारी महापालिका गाठली; परंतु एका महिलेने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित महिलेला आणि इतर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, महापालिका अतिरिक्त आयुक्त विणा पवार यांनी संबंधित कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घेतले.

प्रशासनाकडून संबंधित कुटुंबांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन देण्यात आले. सोमवारी या विषयावर बैठक असून पूर्ण माहिती घेत मार्ग काढण्यात येणार आहे. आंदोलन करणाऱ्यांनी आंदोलनाविषयी पूर्व कल्पना दिल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदवणार नाही. -
वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT