Solapur News | लष्करी अळीमुळे सांगोल्यातील मका पीक धोक्यात File Photo
सोलापूर

Solapur News | लष्करी अळीमुळे सांगोल्यातील मका पीक धोक्यात

औषध फवारण्या करुन शेतकरी मेटाकुटीला; कृषी विभागाकडून उपाययोजना व मार्गदर्शनाचा अभाव

पुढारी वृत्तसेवा
भारत कदम

सांगोला : सांगोला तालुक्यातील खरिपाचे प्रमुख पीक म्हणून मका पिकाची ओळख आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जून महिन्यात तालुक्यातील शेतकर्‍यांनी मका पिकाची लागवड केली आहे. मका पेरणी केल्यापासून पावसाने दांडी मारली आहे. सध्या पेरणी झालेल्या मका पिकावर आठ ते दहा दिवसात मोठ्या प्रमाणावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. हा प्रादुर्भाव इतका मोठा आहे की, अळीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण मका पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याचा मोठा परिणाम शेतीमालाच्या उत्पादनावर झाला असून शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.

ऊस पिकानंतर मका पीक फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे मका पिकाला या परिसरात पसंती दिली जाते. तीनही हंगामात मका पीक घेतले जाते. मका पीक हे चार महिन्यात येत असल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर हे पीक घेतले आहे. या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत कृषी विद्यापीठाकडून मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

शेतीपूरक व्यवसाय असणार्‍या दूध व्यवसायालादेखील मका पीक उपयोगी ठरते. जनावरांच्या चार्‍यासाठी मक्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कमी कालावधीत व कमी खर्चात फायदेशीर असणारे पीक म्हणून मका पिकाची मोठ्या प्रमाणावर तालुक्यात पेरणी होत असते. मका पिकाच्या लागवडीला सर्वसाधारण एकरी तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च येतो. खर्च वगळता सर्वसाधारणपणे 20 हजारपर्यंत फायदा शेतकर्‍यांचा होतो. शेतकर्‍यांना हमखास उत्पादन मिळण्याचे साधन म्हणजे मका पीक आहे.

परंतु, या मका पिकावर लष्कर अळीचा हल्ला होत असल्याने मका पीक भुईसपाट होत आहे. तालुका कृषी विभाग मार्गदर्शन करत नसल्याने पीक अधिकच संकटात आले आहे. लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे मक्यावरील प्रमुख किडीमध्ये अळी असून ही अळी रोपांचे मूळ सोडले तर सर्वच भागांवर हल्ला करते. त्यामुळे येणारे मकाचे कणिस येत नाही. लष्कर अळी हल्ला करून कणिस पोखरते. या अळीला खादाड अळी म्हणून ओळखले जाते. मक्याच्या रोपावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने ती मका पीक नष्ट करते. अळी कवळी पाने खाऊन जगते. मोठ्या अळ्या मोठे पाने खातात आणि शेवटी झाडांचा सांगाडाच शिल्लक राहतो. अळ्या कोवळी कणसेदेखील खातात. अळ्यांचे प्रमाण वाढले की पूर्ण मका पीक फस्त करतात. त्यातच मका पेरणीनंतर पाऊसच पडला नाही. यामुळे पाणी देऊन आलेल्या मकाची वाढ झाली नाही. लष्करी अळी येऊ नये म्हणून अनेक फवारण्या केल्या. पण अळीचा बंदोबस्त होताना दिसत नाही.

मक्याला हमी भाव द्या

कुक्कुटपालनासाठी खाद्य आणि रसायन उद्योग यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता असल्याने मक्याला जोरदार मागणी आहे. या मका पिकाला हमीभाव मिळावा, अशी या भागातील शेतकर्‍यांकडून अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या भागात मका व्यापार्‍यांकडून खरेदी केली जाते. शेतकरी अडचणीत असल्याचा व्यापारी गैरफायदा घेत आहेत. कमी दराने मका खरेदी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT