सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली. सांगोला तालुक्यातील अनकढाळ गावच्या हद्दीत मिरज-सोलापूर महामार्गावरील टोलनाक्याजवळ बनावट देशी मद्य आणि परराज्यातील विदेशी मद्याची वाहतूक करणारा कंटेनर जप्त केला.
यात एकाला अटक झाली. कंटेनरसह एकूण ८४ लाख ९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कंटेनर (क्र. एनएल ०१ एई ६८२३) मधून बनावट देशी मद्याचे १ हजार ७१ बॉक्स जप्त करण्यात आले. त्यामध्ये एकूण १ लाख ७ हजार १०० बाटल्या होत्या. त्यांची किंमत ४२ लाख ८४ हजार रुपये आहे. आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार, सोलापूरच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव व उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपास भोसले करीत आहेत.
अवैध मद्याची माहिती देण्यासाठी संपर्क करा
नागरिकांनी अवैध मद्यनिर्मिती किंवा विक्रीची माहिती टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सांगितले.