pudhari photo
सोलापूर

Solapur Fake Note Case : बनावट नोटा; दोघांना ५ वर्षे सक्तमजुरी

बनावट नोटांची छपाई आणि त्याचे वितरण करणाऱ्या दोन आरोपींना सोलापूर सत्र न्यायालयाने दोषी ठरवून सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहरात बनावट नोटांची छपाई आणि त्याचे वितरण करणाऱ्या दोन आरोपींना सोलापूर सत्र न्यायालयाने दोषी ठरवून सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

विष्णू सिद्राम गायधनकर (वय ३५, रा. भारत हौसिंग सोसायटी, सोलापूर) व संजय धनू पवार (३५, रा. कुमठा तांडा, उत्तर सोलापूर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. १ ऑक्टोबर २०२० रोजी विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आसरा चौक परिसरात संजय पवारकडून १०० रुपयांच्या चार बनावट नोटा जप्त केल्या होत्या. नंतर मुख्य आरोपी विष्णूच्या घरातून ५०० रुपयांच्या ५०० आणि १०० रुपयांच्या ६१० खोट्या नोटा, प्रिंटर, पेपर कटर, शाईच्या बाटल्या आणि कागद पोलिसांनी जप्त केले होते.

सहायक पोलिस निरीक्षक कोल्हाळ व पोलिस शिपाई वाघमारे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता कविता बागल आणि शीतल डोके यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्यांना कोर्ट पैरवी म्हणून गायकवाड, काटकर, सपोनि राजेश डाकेवाड व मैंदाड यांनी सहकार्य केले.

न्यायालयाचा निर्णय व शिक्षा

आरोपी विष्णू गायधनकर याला बनावट नोटा तयार केल्या प्रकरणी पाच वर्षे सक्‍तमुजरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्‍त सहा महिने कारावास, खोट्या नोटा बाळगणे यासाठी तीन वर्षे सक्‍तमजुरी व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारावास आणि खोट्या नोटा छापण्याची साधने बाळगणे यासाठी पाच वर्षे सक्‍तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली तर दुसरा आरोपी संजय पवार याला खोट्या नोटा बाळगल्याप्रकरणी तीन वर्षे सक्‍तमजुरी व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्‍त कारावासाची शिक्षा सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT