सोलापूर : केंद्र सरकारच्या निर्णयाने सोलापूर जिल्ह्यातील 40 साखर कारखानदारांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.
मागील काही वर्षांपासून साखरेचे किमान विक्री दर (एमएसपी) वाढले नाही. मात्र, उसाचे रास्त व किफायतशीर दर वाढले. त्यामुळे साखर कारखानदार अडचणीत आले आहेत. त्यातच निर्यात करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे साखर उद्योगाचे कंबरडे पूर्णपणे मोडणार असल्याचे भाकीत कारखानदारांनी केले आहे. सतत वाढती एफआरपी आणि स्थिर साखर विक्री दरामुळे साखर उद्योग अगोदरच आर्थिक अडचणीत आला होता. त्यातच आता निर्यात बंदीमुळे साखर कारखानदारांतून संताप व्यक्त केला जात आहे.
निर्यातबंदी उठविण्याची मागणी
किरकोळ बाजारातील साखरेचे दर वाढू नये, यासाठी लगेच निर्यात बंदी केली आहे. त्यामुळे सरकारच्या अस्थिर धोरणाचा फटका साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे निर्यातबंदी उठविण्याची मागणी कारखानदारांकडून होत आहे.
मागील चार वर्षांत साखरेचे एमएसपी वाढली नाही. त्यामुळे कारखानदार उसाची रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यातच आता केंद्राने साखर निर्यातबंदी केल्याने साखरेचे दर आणखी कोसळणार आहेत. दर कोसळल्यास कारखानदार शेतकऱ्यांना उसाची रक्कम देणार नाहीत. त्यामुळे साखर निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांच्या जीवावर उठणार आहे.- विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना