Share market fraud file photo
सोलापूर

Solapur Share Market Fraud : शेअरमध्ये भरघोस परताव्याचे आमिष; अभियंत्याची ४४ लाखांची फसवणूक

लखनऊमधून संशयित आरोपीला अटक

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका आयटी अभियंत्याची तब्बल ४४ लाख ७८ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करत सोलापूर सायबर पोलिसांनी लखनऊ येथे जाऊन एका संशयित आरोपीला शिताफीने अटक केली आहे. त्‍याला न्यायालयात हजर केले असता सहा नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

या प्रकरणात मोहम्मद आलम (रा. कानपूर) आणि शाहीद अली (रा. लखनऊ) या दोघांची नावे समोर आली. यातील शाहीद अली याला सोलापूर सायबर पोलिसांनी लखनऊ येथून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. तर मोहम्‍मद आलम याला नोटीस देऊन सोडण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आयटी अभियंत्याला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर त्याच्याकडून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करून घेण्यात आली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणाची तक्रार सायबर पोलिसांकडे करण्यात आली. या प्रकरणात सप्टेंबर २०२६ मध्ये शहर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान फसवणुकीची रक्कम ज्या बँक खात्यात जमा झाली, त्या खात्याची माहिती पोलिसांना मिळाली. या खात्याचा संबंध मोहम्मद आलम याच्याशी असल्याचे समोर आले. त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले.

या प्रकरणातील दुसरा संशयित शाहीद अली याचा शोध घेतला. तो लखनऊ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोलापूर सायबर पोलिसांचे पथक लखनऊला रवाना झाले. पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेत अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT