Devendra Fadnavis Pudhari
सोलापूर

Solapur News: सोलापूरच्या उन्नत मार्गाला निकडीच्या प्रकल्पाचा दर्जा

मंत्रिमंडळाची मान्यता

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर/मुंबई : सोलापूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील जुना पुणे नाका ते बोरामणी नाक्यापर्यंतच्या चारपदरी उन्नत मार्गिकेस आवश्यक निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

प्रकल्पासाठी विविध शासकीय विभागाच्या जमिनी कोणताही भोगवटा मूल्य न आकारता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित होणार असल्यामुळे हा प्रकल्प गतीने पूर्ण होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार या प्रकल्पाच्या निकडीची आणि अनुषंगिक बाबींची पडताळणी करून, हा प्रस्ताव सादर करण्यात आला. यामुळे सोलापूर शहर, जिल्ह्यांतील वाहतुकीसह आंतरराज्यीय वाहतूक सुरळीत होणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील सोलापूर शहरातून जाणारा जुना पुणे नाका ते बोरामणी नाका उन्नत मार्ग सोलापूर शहरातील आणि आंतरराज्य वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी जुना पुणे नाका ते बोरामणी नाकादरम्यान चार पदरी उन्नत मार्ग आणि आवश्यक तिथे सेवा रस्ता आणि पोच मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या उन्नत मार्गामुळे सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे.

या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आवश्यक असणारी बहुतांश जमीन राज्य शासनाच्या विविध विभागांच्या ताब्यात आहे. सार्वजनिक हिताच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आवश्यक असणारी शासकीय जमीन संबंधित विभागाला वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प आवश्यक निकडीचा सार्वजनिक म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT