Elections 
सोलापूर

Solapur News : जिल्ह्यातील १,३६५ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ‘ब्रेक’

दुष्काळी परिस्थितीमुळे थांबल्‍या निवडणुका

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सोलापूर जिल्ह्यालाही फटका बसला आहे. जिल्ह्यातील तब्बल १,३६५ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ‘ब्रेक’ लागला आहे. याला अपवाद डीसीसी बँक निवडणुकीचा आहे. पंढरपूर तालुक्‍यातील सर्वाधिक संस्‍थांचा समावेश आहे.

दुष्काळ निवारण आणि मदतकार्यात महसूल, कृषी, सहकार यासारख्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्यस्त राहावे लागणार असल्याने, तसेच दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व सभासदांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यात अडचणी येऊ नयेत, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर कार्यालयकडील आकडेवारीनुसार, आगामी वर्षात निवडणुकास पात्र असलेल्या एक हजार ३६५ विविध वर्गवारीतील संस्था असून, त्‍यांची निवडणूक तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.

तालुकानिहाय संख्या

अक्कलकोट : ९६, उत्तर सोलापूर : ५४, करमाळा : ६९, दक्षिण सोलापूर : ९६, पंढरपूर : १४३, बार्शी : १४०, मंगळवेढा : ७४, माढा : १३९, माळशिरस : १०५, मोहोळ : १२२, सांगोला : ८८, सोलापूर शहर : २७, प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग सोलापूर : सात, सहायक निबंधक, सहकार संस्था दुग्ध सोलापूर : २६, प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर विभाग सोलापूर : तीन. अशा एकूण : १,३६५ संस्थांच्‍या निवडणुका थांबल्‍या आहेत.

उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या निवडणुका तसेच शासन निर्णयापूर्वी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेल्या संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. इतर १,३६५ संस्थांच्या निवडणुका शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत थांबविण्यात आल्‍या आहेत.
- मुकुंद पवार, जिल्‍हा उपनिबंधक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT