कासेगाव : ५७-बोरामणी जिल्हा परिषद गटांतर्गत पंचायत समिती ११३–कासेगाव गणातील मुळेगाव तांडा येथील क्रमांक २० मतदान केंद्रावर नियमित मतदान सुरू असताना एक संशयास्पद प्रकार घडला. मतदान करून बाहेर येताच एका महिलेला चक्कर येऊन ती कोसळली. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर तिने ईव्हीएमच्या बॅलेट युनिट मशीनखाली लिंबू-मिरची ठेवण्यात आल्याचा दावा केला.
ही बाब लक्षात येताच अपक्ष उमेदवार संदीप राठोड यांनी तत्काळ मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत ईव्हीएम मशीनखाली लिंबू-मिरची व काळा दोरा आढळून आला. त्यामुळे मतदान केंद्र परिसरात एकच खळबळ उडाली.
अंधश्रद्धेशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त करण्यात आली. हा प्रकार कोणी व कोणत्या उद्देशाने केला, याचा शोध घेण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. घटनेनंतर काही काळ मतदान केंद्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात येत आहे.