सोलापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर गुन्हे शाखेने वृद्ध नागरिकाला लुटणाऱ्या दोन आरोपींना बारा तासांच्या अवधीत गजाआड केले. दत्ता चौक परिसरात एका वृद्धाकडील १ लाखांची रोकड असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून ते पळून गेले होते. त्यांच्याकडून चोरीची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गणेशोत्सवानिमित्त गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान, जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील कंपाऊंड भिंतीलगतच्या सार्वजनिक रस्त्यावर दोन इसम एका काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर (एम. एच. १३ डीएफ ५३३४) संशयास्पद स्थितीत थांबल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.
पोलिसांनी तत्काळ सापळा रचून मल्लिनाथ राजशेखर जवळगी (वय ३६, रा. शेटेवाडा, उत्तर कसबा, मूळ रा. सुलेरजवळगे, ता. अक्कलकोट) आणि नागेश मल्लिनाथ बळते (वय १८ रा. उत्तर कसब, शेटे वाडा, सोलापूर) या दोन संशयितांना ताब्यात संशयितांची कसून चौकशी केली. या वेळी त्यांनी दत्ता चौक येथील 'राजेंद्र ज्वेलर्स' दुकानाजवळून पायी जात असलेल्या एका वृद्ध इसमाचा पाठलाग केल्याची कबुली दिली.
चोरांनी वृद्धाला दमदाटी करून, त्यांच्या हातातील १ लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून मोटारसायकलवरून पळ काढला होता. त्यांच्या विरोधात फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमार एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे, पोलीस अंमलदार वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे आणि शंकर याळगी यांच्या पथकाने केली.