सोलापूर : माढा तालुक्यातील जामगाव येथे घरफोडीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्याने ६१ वर्षीय वृद्धाचा हातोड्याने डोक्यात घाव घालून खून केला.
अजयकुमार गौतम चव्हाण (वय ३१, रा. जामगाव, ता. माढा, सध्या रा. लऊळ, ता. माढा) असे त्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास कर्नाटकातील वाडी रेल्वे स्थानकावरून अटक केली. कर्जबाजारी झाल्याने पैशांची गरज निर्माण झाली होती. २५ ते २६ ऑगस्टच्या मध्यरात्री जामगाव येथील विजयकुमार अशोक मुळे यांच्या घरात त्याने प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उचकटून त्यातील सुमारे २ लाख ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
यावेळी घरात झोपलेले अशोक भीमाण्णा मुळे (वय ६१) जागे झाले. त्यांनी आरोपीला ओळखल्याने आरोपीने हातोड्याने डोक्यात जबर मारहाण केली. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वपोनि संजय जगताप यांनी चार स्वतंत्र पथके तयार केली. सपोनि विजय शिंदे यांच्या पथकाने जामगावमध्ये तीन दिवस तळ ठोकला.
गोपनीय माहितीच्या आधारे अजयकुमार चव्हाण याच्यावर संशय बळावला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व वाडी रेल्वे पोलिसांची मदत घेत त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलिस अधीक्षक, पंढरपूर विभाग प्रेरणा कट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वपोनि संजय जगताप, विजय शिंदे, बालाजी कांबळे, संजय राठोड, नारायण गोलेकर, सलीम बागवान, रवि माने, अतुल घाडगे, दशरथ गोरे, आबासाहेब मुंढे, अश्विनी गोटे, अनवर अत्तार, समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, योगेश जाधव, सूरज रामगुडे, प्रमोद गायकवाड, मनोज राठोड, रतन जाधव, सुनील पवार, रोहित शिंदे, मोहमद शेख, विवेक माने, सचिन देशमाने यांनी पार पाडली.
कर्जबाजारी युवकाने केली यूट्यूब पाहून चोरी
अजयकुमार चव्हाण याने घराच्या मागील बाजूच्या पाईपवरून चढून घरात प्रवेश केला. वरच्या खोलीचे लोखंडी कुलूप सिरिंजच्या साहाय्याने पेट्रोल टाकून पेटविले. ही पद्धत त्याने यूट्यूबवरील व्हिडिओत पाहिली होती. घरातील कपाट फोडत असताना अशोक मुळे जागे झाले. त्यांनी आरोपीला ओळखल्याने अजयने हातोड्याने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला आणि त्यानंतर दागिने घेऊन पसार झाल्याचे तपासात समोर आले.