सोलापूर : शहरातील मुरारजी पेठ परिसरातील उमानगरी येथे लहान भावानेच मोठ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीचा वार करुन खून केला. रविवारी (दि. २९) मध्यरात्री एकच्या सुमारास खुनाची ही घटना घडली.
संभाजी देविदास माने (वय ३२, रा. मानेवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे मृताचे नाव आहे. तानाजी देविदास माने (वय २१, रा. मानेवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव; सध्या रा. उमा नगरी, मुरारजी पेठ, सोलापूर) असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी मृताची आई यशोदा माने (वय ५४) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीला दारूचे व्यसन होते. घटनेदिवशी संभाजीने आई घरात नसल्याबाबत तसेच कुऱ्हाड कुठे आहे, असे विचारत आईच्या चारित्र्यावर संशय घेतला. यावेळी त्याने तानाजी आणि आईला शिवीगाळ केली. त्यानंतर तानाजीने कुऱ्हाडीच्या लोखंडी पात्याच्या उलट्या बाजूने संभाजीच्या डोक्यात चार ते पाच वेळा वार केले. त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला. सुमारे दोन तास मृतदेहाशेजारी बसून होता. पहाटे त्याने स्वतः पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. सकाळी सातच्या सुमारास पोलिसांनी पंचनामा आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तानाजीला ताब्यात घेले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.
दरम्यान, माने कुटुंबीयांची मानेवाडी येथे दहा एकर शेती आहे. मात्र, सोलापुरात आई आणि तानाजी काम करून उदरनिर्वाह करत होते. आई एका इडलीगृहात काम करत होत्या, तर तानाजी वेल्डिंग दुकानात कामाला होता. संभाजी भजन-कीर्तन करत असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.
आईला मारहाण
संभाजीच्या दारूच्या व्यसनामुळे माने कुटुंबात सतत वाद होत होते. दारू पिऊन तो आईला मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून आई आणि तानाजी यांनी मानेवाडी सोडून सोलापुरात बहिणीकडे राहण्याचा निर्णय घेतला होता. संभाजी मात्र गावी एकटाच राहत होता. तो अधूनमधून सोलापुरात आईकडे येत असे, अशी माहिती नातेवाइकांनी दिली.