सोलापूर : सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून १४.७१ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ४१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त डॉ. एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त डॉ. प्रितम यावलकर व सहायक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुरी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या सूचनेनुसार, गुन्हे शाखा पथकाने रविवारी पेट्रोलिंगदरम्यान सिद्धेश्वर चौक परिसरात सापळा रचला. त्यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात एमडी आढळून आला.
मुजम्मील हबीब कोथींबीरे (वय २१, रा. साखर पेठ, सोलापूर) आणि निलेश बसवराज बिळूर (२७, रा. काडादी चाळ, रेल्वे स्टेशन परिसर, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मुजम्मीलकडून ६.८२ ग्रॅम एमडी, विवो कंपनीचा मोबाईल व दोन हजार रुपये, तर निलेशकडून ७.८९ ग्रॅम एमडी आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्रनाथ भंडारे, सपोनि राहुल सावंत यांच्या पथकाने केली. यामध्ये संतोष पापडे, राजेश चव्हाण, प्रमोद पकाले, विशाल बोराडे, उमेश चव्हाण, हणमंत पुजारी, परशूराम म्हेत्रे, अमीन शेख , सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, काशिनाथ वाडेकर, आनंद निंबाळकर यांनी सहभाग घेतला.