मंगळवेढा : मान्सून पावसाच्या हुलकावणी बरोबर म्हैसाळ योजनेचे पाणी शिरनांदगी तलावात न आल्यामुळे सध्या तलावातील पाणीसाठा संपल्याने शेतकऱ्यांतून हाता-तोंडाशी आलेली पिके जळून जाण्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात भीमा नदी व उजनी व म्हैसाळ कालव्याचे लाभक्षेत्र वगळता शिरनांदगी तलावामुळे शिरनांदगी चिक्कलगी, महमदाबाद, हुन्नूर या परिसरातील बागायत लाभक्षेत्र मोठ्या प्रमाणात झाली. परंतु गेल्या दोन वर्षात हा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहिले.
सध्या कालव्याच्या वितरिकेतून रड्डे येथील सरपंचानी पाणी सोडण्याची मागणी करून देखील तलाव प्रशासनाकडून त्या लगतच्या शेतकऱ्यांना पाणी सोडले जात नाही. परंतु दरवर्षी म्हैसाळच्या पत्रिकेतून पाणी तलावात सोडण्याची मागणी केली जात आहे. मात्र म्हैसाळकडून ते पाणी अद्याप यंदाच्या वर्षी सोडण्यात न आल्यामुळे दोन गावातील शेतकऱ्यांत वाददेखील झाला. शेतकऱ्यांनी तलावातील पाण्यावर अवलंबून असलेल्या बागायत क्षेत्राबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या पाईपलाईन देखील तलावातून केल्या. त्यासाठी सोसायटी, राष्ट्रीय बँका, पतसंस्थेच्या माध्यमातून कर्जरोखे घेतले.
परंतु या दोन वर्षातील उत्पन्नामुळे यातील कर्जाचा काही भाग कमी होण्याची शक्यता असतानाच सध्या त्याचा मोठा फटका ट्रान्सफॉर्मर वीजपुरवठा खंडित केल्यामुळे बसणार आहे. अगोदरच पावसाने हुलकावणी दिली, त्यात तलावातील पाण्यावर तग धरून असलेली पिके आता खंडित वीज पुरवठ्यामुळे जळून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.