सोलापूर : ‘अल निनो’च्या प्रभावामुळे सोलापूर जिल्ह्यात सरासरीच्या पन्नास टक्केच पाऊस पडल्याने दुष्काळाचा ट्रिगर १ लागू झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांची नुकसानभरपाई देण्यासाठी आजपासून (दि. २८) पंचनामे केले जाणार आहेत. त्यासाठी कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांची संयुक्त समिती असणार आहे.
राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, करमाळा, बार्शी, माढा, सांगोला या अकराही तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश केला आहे. परंतु, पीक नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी पंचनामे करावे लागणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी ३९८ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित असताना यंदा केवळ १९८ मि.मी. इतकाच म्हणजेे ५० टक्के पाऊस पडला आहे. यंदा पावसाची तूट ही ५० टक्के आहे. त्यामुळे सुमारे साडेचार लाख हेक्टरवरील खरीप पिकांतील पावणे चार लाख हेक्टर पिके करपून गेले आहेत. याबाबत गेल्या पंधरा दिवसांपूर्वी प्रांताधिकाऱ्यांच्या समितीने पीक नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. आता दुष्काळ जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्षात पिकांच्या झालेल्या नुकसानचे पंचनामे केली जाणार आहे.
‘उजनी’तील ३५ टीएमसी पाणीसाठा राखीव
सोलापूर शहरासह सांगोला, पंढरपूर, मंगळवेढासह भीमा नदीकाठच्या गावांची पिण्याच्या पाण्याची योजना अवलंबून आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबर २०२६ ते ३१ जुलै २०२७ या कालावधीसाठी उजनी धरणातील ३५ टीएमसी पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे, याबाबत लवकरच पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.
‘उजनी’त गतवर्षीपेक्षा सात टीएमसी पाणीसाठा कमी
उजनी धरण गेल्या वर्षी ओव्हर फ्लो झाले होते. २७ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ‘उजनी’त एकूण पाणीसाठा हा ११३.८३ टीएमसी, तर उपयुक्त पाणीसाठा ५०.१७ टीएमसी इतका आहे. तर गेल्या वर्षी याच तारखेला उजनीत एकूण पाणीसाठा १२०.७७ टीएमसी इतका, तर उपयुक्त पाणीसाठा ५७.११ टीएमसी इतका होता. त्यामुळे यंदा अल निनोेचे संकट, कमी झालेले पर्जन्यमान यामुळे पुढील वर्षभरासाठी पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे लागणार आहे.