अक्कलकोट : तालुक्यातील चिक्केहळ्ळी साठवण तलाव पूर्णक्षमतेने भरला आहे. या तलावाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या होत्या. परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली; मात्र तलावाचे काम निकृष्ट झाल्याचे स्पष्ट होत आहे. दक्षता म्हणून तत्काळ महसूल, पोलिस व पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी पाहणी करून सांडव्यातून पाणी काढण्यास सुरुवात केली आहे.
तालुक्यात सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळेे संपूर्ण तालुक्यातील धरण, साठवण तलाव, धुबधुबी, पाझर तलाव, नदी, नाले, ओढे भरून वाहत आहेत. सतत पूर येत आहे. चिक्केहळ्ळी तलावाला गुरुवारी सायंकाळपर्यंत फारशा भेगा दिसत नव्हत्या. रात्री उशिरा मोठ्या प्रमाणात भेगा दिसायला सुरुवात झाली. तेव्हा स्थानिक शेतकरी, ग्रामस्थांमध्ये एकच गोंधळ उडाला. ही बाब आमदार सचिन कल्याणशेट्टी, तहसीलदार विनायक मगर, पोलिस अधिकार्यांच्या लक्षात आणून देण्यात आली. त्यावरून हालचाली सुरू झाल्या. त्यांनी प्रत्यक्षात घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचार्यांनी अस्तित्वात असलेल्या सांडव्याला मोठा करून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर काढण्यास सुरुवात केली. यावरून दुर्घटना टळली. अन्यथा हजारो शेतकर्यांची शेती, तीन गावांचे मोठे नुकसान झाले असते.
चिक्केहळ्ळी येथील नूतनीकरण करण्यात आलेला साठवण तलाव मध्यभागी खचला आहे. घटनास्थळी बीट अंमलदार पीएसआय ननावरे, पोलिस हवालदार विपीन सुरवसे, माने, मंडळ अधिकारी एस. यु. शेख, तलाठी पांढरे, ग्रामसेवक मल्लिकार्जुन एकनाथ, पोलिस पाटील योगेश जाधव, कोतवाल मल्लिनाथ कलशेट्टी, संगोळगी आळंद तलाठी आशिष यादव, पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच चिक्केहळ्ळी येथील शेतकरी व संगोळगी गावातील शेतकरी उपस्थित होते.
सदर तलावाला चार वर्षांपूर्वी याच ठिकाणी भेगा पडल्या होत्या. यामुळे शासनाकडून तब्बल 9 कोटी रुपये निधी मंजूर करून खर्च करण्यात आले. पुन्हा त्याचठिकाणी भेगा पडून धोका निर्माण झाला आहे. सदर काम दर्जेदार होण्याऐवजी निकृष्ट दर्जाचे झाले आहे का ? अशी नागरिकांमधून उलटसुलट चर्चा होत आहे. चिक्केहळ्ळी, संगोगी(आ), हत्तीकणबस, तोरणी अशी काही गावांची हजारो हेक्टर जमिनीची भिस्त आहे. तसेच पाणीपुरवठाही अवलंबून आहे.
या तलावाचे काम आणखी पूर्ण झालेले नाही. त्यासाठी 9 कोटी रुपये निधी मंजूर झाले होते. पूर्वी याचठिकाणी भेगा पडल्या होत्या. त्यामुळे फुटून धोका होऊ नये, म्हणून काम सुरू केले होते. पुन्हा त्याचठिकाणी भेगा पडल्या आहेत. सध्या सांडव्यातून पाणी काढण्याचे काम सुरू झाले आहे.- आर. डी. क्षीरसागर, जिल्हा जलसंधारण अधिकारी
तलावाच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याबाबत पाटबंधारे अधिकारी, कर्मचार्यांचे दुर्लक्ष कसे काय झालेे. या घटनेची सखोल चौकशी होऊन जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे.- सुधीर मचाले, माजी सरपंच, चिक्केहळ्ळी