सोलापूर : पुणे विभाग शिक्षक - पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांना शहर व जिल्ह्यात वाढता पाठिंबा मिळत असून, त्यांना पहिल्या पसंतीचे मतदान करण्याचा निर्धार व्यक्त होत आहे.
पदवीधर व शिक्षक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.१४) सायंकाळी शहरातील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूलमध्ये बैठक झाली. या बैठकीस भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजप सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, विद्या समितीचे अध्यक्ष राम साळुंखे, भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस सुदर्शन यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मतदारांशी संपर्क साधण्यासाठी पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांनुसार मार्गदर्शन करण्यात आले. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीच्या क्रमाने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. या बैठकीस भाजप पदाधिकारी, बापूजी साळुंखे शिक्षण संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच डीपीयू सोलापूर कोअर टीमचे सदस्य उपस्थित होते.
डॉ. शैलेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली गाठीभेटी
भाजप पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉ. शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज विविध क्षेत्रांतील पदवीधर मान्यवरांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. या संपर्क अभियानाला डॉ. अमोल पाटील, राम डोके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. श्री सिद्धेश्वर सहकारी बँक, श्री नीलकंठेश्वर सहकारी बँक, जनता सहकारी बँक तसेच केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या कार्यालयांत पदाधिकारी, मान्यवर आणि पदवीधरांशी संवाद साधला. भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना पाठिंबा देण्याचे तसेच त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. या अभियानात नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, नगरसेवक रुद्रेश बोरामणी, सचिन कुलकर्णी, उमेश कोळेकर, धरीराज रमणशेट्टी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, या निवडणुकीत ९५ टक्के मतदान करून घेण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याने घ्यावी, विजय आपलाच आहे, असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले. बार्शी येथे पुणे पदवीधर मतदार संघातील डॉ. स्मिता जाधव व शिक्षक मतदार संघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या व शहर ग्रामीण भागातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, सभापती दीपक रोंगे, मोहन डांगरे, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, आसिफ तांबोळी, अरुण बारबोले, संतोष निंबाळकर, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, रणवीर राऊत, उपनगराध्यक्ष रोहित पाटील यांच्यासह नगरपालिका जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आ. राऊत म्हणाले, ही निवडणूक काळजीने पार पाडावी. एका व्यक्तीने दहा मतदारांची जबाबदारी घेऊन त्यांना मतदान केंद्रावर आणावे. विरोधक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी ही निवडणूक जिंकणे गरजेचे आहे. जर पक्ष आणि नेते सुरक्षित नसतील तर त्याचा परिणाम खालपर्यंत होतो. मतदानात कोणतीही चूक होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मोहन डांगरे, संभाजी घाडगे, विलास वळेकर यांनी विचार व्यक्त केले. मोहन डांगरे म्हणाले, मतदाराला बाहेर काढून मतदान करून घेणे गरजेचे आहे. राऊत यांनी पश्चिम महाराष्ट्रात नेतृत्व करावे, अशी ज्येष्ठ नेत्यांची अपेक्षा आहे. हा महत्त्वाचा टप्पा असून, सर्वांनी चांगले काम करावे, असे आवाहन करण्यात आले.