सोलापूर : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याला बुधवारी (दि.२१) सोलापुरात उदंड प्रतिसाद मिळाला. धार्मिक स्थळांचे दर्शन, विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या गाठीभेटी आणि पदवीधर मतदारांशी थेट संवाद साधत त्यांनी प्रचार केला.
प्रारंभी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडेय महामुनींच्या मंदिरात नतमस्तक होऊन डॉ. स्मिता जाधव यांनी प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. आ. सुभाष देशमुख, सोलापूर श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने, श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, वालचंद शिक्षण समूहाचे डॉ. रणजित गांधी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटी डॉ. स्मिता जाधव यांनी घेतल्या.
काशी पीठ जगद्गुरूंचे शुभाशीर्वाद
अक्कलकोट रस्त्यावरील बृहन्मठ होटगी मठास उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी भेट दिली. मठात काशीपिठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामींचे दर्शन घेतले. यावेळी ‘यशस्वी भवः’ असा आशीर्वाद महास्वामींनी उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना दिला. महास्वामींनी विजयासाठी शुभाशीर्वाद देत चांगले काम करण्याचे आवाहन केले.
आ. सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा
महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी दक्षिण सोलापूरचे आ. सुभाष देशमुख यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन, बूथनिहाय तयारी आणि मतदानाच्या दिवशी करावयाच्या व्यवस्थेबाबत यावेळी आ. देशमुख आणि उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्यात चर्चा झाली. यावेळी श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख यांनी पदवीधर मतदार नोंदणीसंदर्भातील माहिती दिली. मंडल अध्यक्ष अर्जुन जाधव आणि महेश देवकर उपस्थित होते.
धर्मराज काडादी यांच्या निवासस्थानी भेट
उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुष्कराज काडादी, तेजश्री काडादी, प्राचार्य गजानन धरणे, गिरीश बुगडे, संजय मंठाळे, शांतय्या स्वामी, संजय कुलकर्णी, डॉ. शैलेश पाटील आणि अमोल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
माजी आ. दिलीप माने यांच्याशी संवाद
श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, माजी आ. दिलीप माने यांची उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी भेट घेतली. यावेळी माने यांनी प्रचार सुरू असल्याचे डॉ. जाधव यांना सांगितले. तसेच आमच्या भागातून आपल्याला पहिली पसंती मिळेल, असे आश्वासन दिले.
मित्रपक्षांची भक्कम साथ
भाजप महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देत आमच्या पक्षाची तुम्हाला भक्कम साथ असल्याचे सांगितले. यावेळी शहराध्यक्ष पवार यांनी उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान, अजित बनसोडे यांची उपस्थिती होती.
वालचंद समूहच्या डॉ. गांधींकडून शुभेच्छा
उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी वालचंद शिक्षण समूहाचे सेक्रेटरी डॉ. रणजित गांधी यांची भेट घेतली. यावेळी पृथ्वीराज गांधी, माया गांधी, वालचंद शिक्षण समूहाचे व्यवस्थापन समिती सदस्य पराग शहा आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी माया गांधी यांनी उमेदवार डॉ. स्मिता यांचा भेटवस्तू देत सत्कार केला. संस्थेचे सेक्रेटरी डॉ. गांधी यांनी उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना शुभेच्छा दिल्या.
दौऱ्यात यांचा होता सहभाग
या दौऱ्यात भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, नगरसेविका वृषाली चालुक्य, भाजपा पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉ. शैलेश पाटील, भाजप शहर उपाध्यक्षा साधना संगवे, डॉ. अमोल पाटील, उमेश कोळेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनता बँकेत साधला संवाद
जनता सहकारी बँकेतील पदवीधर मतदारांशी संवाद साधताना डॉ. स्मिता योगेश जाधव यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उद्योजिका व माजी नगरसेविका चंद्रिका चव्हाण यांच्यासह बँकेचे अधिकारी, महिला कर्मचारी आणि मतदार उपस्थित होते. भाजप नगरसेवक अनंत नेताजी जाधव यांच्याशीही प्रचाराबाबत चर्चा झाली. या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन करण्यात आले.