सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये दररोज 250 मे. टन घरगुती गॅस, तर 10 मे. टन व्यावसायिक गॅसची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर गॅसपुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी केवळ आठ ते दहा दिवस इतकाच गॅसपुरवठा होईल, इतकाच साठा शिल्लक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहे. मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी शुक्रवारी बैठक घेतली.
या बैठकीत एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीएल कंपनीच्या प्रतिनिधी यांच्याकडून सांगण्यात आले की, घरगुती गॅस सिलिंडरचा किमान आठ ते दहा दिवसांचाच साठा उपलब्ध आहे. तर व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा अत्यावश्यक सेवांसाठी मागणीप्रमाणे उपलब्ध केला जाणार आहे. कंपन्यांकडून जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा नियमितपणे उपलब्ध केला जात असल्याने घरगुती गॅस सिलिंडरची कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याची माहिती एचपीसीएलचे प्रतिनिधी विनोद कुमार यांनी दिली.
तिसऱ्या दिवशीही सिलिंडरसाठी रांगा
शहरात सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारीही घरगुती गॅसचा तुटवडा जाणवला. कारण, वेगवेगळ्या ठिकाणी गॅस एजन्सी समोर ग्राहकांनी सिलिंडरसाठी गर्दी केली होती. दुसरीकडे गॅस बुकिंगसाठी मिस्ड कॉल देऊनही बुकिंग होत नसल्याच्या तक्रारी कायम होत्या.
जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय विभाग, सर्व रुग्णालयांना मागणीप्रमाणे व्यावसायिक गॅस पुरवठा केला जाणार आहे. तरी संबंधित विभागांनी तालुका निहाय याद्या पुरवठा विभागाला उपलब्ध करून द्याव्यात. त्याप्रमाणे संबंधित तालुक्यातील एजन्सीकडून व्यावसायिक गॅसचा पुरवठा संबंधित यंत्रणांना होणार आहे. त्यामुळे अडचणी येऊ देणार नाही.- कुलदीप जंगम, प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी