सोलापूर : येथील जिल्हा रुग्णालय, रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर व रोटरी ई-क्लब ऑफ सोलापूर इलाईट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत चष्मा वाटपाचे आयोजन केले होते. यामध्ये ८५० गरजूंना चष्म्याचे वाटप करण्यात आले.
यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निदान व उपचार केंद्र यांच्या अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील ८५० गरजू मुलांचा समावेश होता. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा मौखिक अधिकारी डॉ. रोहन वायचळ, मेट्रन विजयामाला बेले व रोटरीचे प्रतिनिधी जयेश पटेल आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रीय बाल स्वास्थ योजनेच्या माध्यमातून शाळा व अंगणवाडी या स्तरावर बालकांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. या तपासणीत दृष्टीदोष आढळलेल्या मुलांचे वेळेवर निदान करून त्यांच्यावर उपचार करून मोफत चष्मे उपलब्ध करून दिले जाते.
या सामाजिक उपक्रमामुळे अनेक बालकांना दृष्टीदोषामुळे अभ्यासात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यास मदत होणार आहे. अनेक मुलांना दृष्टीदोष असतानाही परिस्थितीमुळे तपासणी व वापर करणे अवघड होते. त्यांच्यासाठी हा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरला आहे. त्यामुळे या मुलांच्या पालकांतून समाधान व्यक्त होत आहे. या उपक्रमाने मुलांना दृष्टीदोष जाणवणार नाही. सूत्रसंचालन डॉ. पल्लवी आंभोरे यांनी केले. रोहन तमशेट्टी यांनी आभार मानले.