सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कलम ८८ अन्वये अपात्र ठरविण्यात आलेल्या सहा माजी संचालकांच्या विशेष अनुमती याचिकेवर शुक्रवारी (दि. २०) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी या सुनावणीबाबत केवळ शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आता न्यायालयाच्या कामकाजात ही प्रकरणे २० नोव्हेंबरला सुनावणीसाठी निश्चित झाली आहेत.
माजी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ. संजय शिंदे, माजी आ. दिलीप माने, माजी आ. जयवंतराव जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे आणि बबनराव आवताडे या सहा माजी संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती आर. महादेवन आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
माजी संचालकांना दिलासा मिळणार का
अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांना चिन्हवाटपही करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत अपात्रतेच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या माजी संचालकांच्या याचिकांवर काय भूमिका घेतली जाते, तसेच त्यांना कोणता दिलासा मिळतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या सुनावणीचा परिणाम निवडणूक प्रक्रियेवर होणार का, याकडेही राजकीय आणि सहकार क्षेत्रांचे लक्ष लागले आहे.