सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या नऊ जागांसाठी आज गुरुवारी (दि.२५) अकरा मतदान केंद्रांवर दोन हजार ५९६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही नजर राहणार आहे.
बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सोलापूर शहरातील दोन केंद्रांसह जिल्ह्यात एकूण ११ मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली.
संचालक मंडळाच्या एकूण १९ जागांपैकी १० जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि.२७) सकाळी ८ वाजल्यापासून हैदराबाद रोडवरील सहकारमहर्षी वि. गु. शिवदारेअण्णा सभागृहात मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
मतदान केंद्रे (कंसात मतदार संख्या)
उत्तर सोलापूर (३२७) : डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, श्री सिद्धेश्वर मंदिराशेजारी (सोलापूर शहर) दक्षिण सोलापूर (१०८) : समाजकल्याण केंद्र, रंगभवन चौकाजवळ (सोलापूर शहर). माढा (४३७) : सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक कार्यालय, माढा. पंढरपूर (३५१): शेतकरी निवास, कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड), पंढरपूर.
माळशिरस (३२२) : जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श कन्याशाळा, माळशिरस. सांगोला (२२१) : बचत भवन, पं. समिती, सांगोला. बार्शी (२१४) : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्था (बार्शी शाखा), ढगे मळा, कुर्डूवाडी रोड, बार्शी. मोहोळ (१९३) : गटसचिवांचे सभागृह (मिटिंग हॉल), बाजार समिती आवार, मोहोळ. करमाळा (१६५) : पं. समिती सभागृह, करमाळा. अक्कलकोट (१३६) : स्वामी समर्थ सहकारी बँक, ए वन चौक, अक्कलकोट. मंगळवेढा (१२२): जिजामाता प्रशाला, मंगळवेढा.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शंभर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया व्यवस्थित व्हावी, कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी प्रत्येक केंद्रावर तीन पोलिस असे ३३ आणि इतर सात अशा एकूण ४० पोलिसांचा बंदोबस्त मतदान केंद्रावर लावण्यात आले आहे.- मुकुंद पवार, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक