सोलापूर : जिल्ह्यात ज्या नेत्यांनी दशकानुदशके जिल्हा बँकेच्या राजकारणावर पकड ठेवली, त्यांच्या पुढच्या पिढीकडे आता अधिकृतपणे सहकाराची सूत्रे जाणार आहेत. बँकेच्या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांचा मार्ग बंद झाल्याने त्यांच्या मुलांचा प्रवेश निश्चित झाल्याने घराणेशाहीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतून माजी संचालक तथा प्रस्थापित नेते अपात्र ठरले. त्यांचा बँकेतील मार्ग बंद झाला असून, त्यांच्या मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. बँक निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणात मोठे सत्तांतर पाहायला मिळत आहे. कायदेशीर कारवाई आणि अपात्रतेच्या कचाट्यात सापडल्याने बँकेतील सहा माजी संचालकांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग बंद झाला आहे.
मात्र, हा राजकीय अडथळा पार करण्यासाठी दिग्गज नेत्यांनी पुत्रप्रेमासह राजकीय वारसदारांना रणांगणात उतरवण्याची रणनीती आखली होती. त्यामुळे जिल्हा बँकेत आता वडिलांऐवजी मुलांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
वर्चस्व कायम ठेवण्यासाठी खेळी
जिल्हा बँकेच्या कारभारातील अनियमितता आणि कायदेशीर तरतुदींमुळे सहा माजी संचालकांवर अपात्रतेची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे या अनुभवी नेत्यांना स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार नाही. ही राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी आणि आपापल्या तालुक्यातील तसेच बँकेतील गटाचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी माजी सहा संचालकांनी मुलगा, चुलत भावांना पुढे केल्याची चर्चा होत आहे.
कोणत्या नेत्याचे कोणते वारसदार रणांगणात?
माजी आ. संजयमामा शिंदे यांचे पुत्र यशवंत शिंदे, माजी आ. दिलीप माने यांचे पुत्र पृथ्वीराज माने, माजी आ. जयवंतराव जगताप यांचे पुत्र शंभूराजे जगताप, सुरेश हसापुरे यांचे पुत्र श्रीदीप हसापुरे, बबनराव आवताडे यांचे पुत्र सिद्धेश्वर आवताडे तर माजी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे चुलत भाऊ अर्जुनसिंह मोहिते-पाटील निवडणुकीच्या रणांगणात आहेत.