Solapur District Bank 
सोलापूर

Solapur District Bank : आ. कल्याणशेट्टी यांची चेअरमन पदासाठी प्रबळ दावेदारी

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपा प्रणित सहकार विकास पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व

पुढारी वृत्तसेवा

अक्कलकोट : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपा प्रणित सहकार विकास पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व मिळविल्याने अक्कलकोटमध्ये जल्लोष करण्यात आला. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची चेअरमन पदासाठी प्रबळ दावेदारी मानली जात आहे.

सोसायटी मतदारसंघातून डीसीसी बँकेच्या संचालकपदी आ. सचिन कल्याणशेट्टी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील त्यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात त्यांनी आपले राजकीय संबंध आणि जनसंपर्क वाढवला आहे.

ज्येष्ठ नेत्यांशी समन्वय साधत राजकारण करण्याची त्यांची पद्धत त्यांच्या जमेची बाजू मानली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले त्यांचे निकटचे राजकीय संबंध आणि पक्ष संघटनेतील वाढती जबाबदारी यामुळे डीसीसी बँकेच्या चेअरमनपदासाठी त्यांच्या नावाला अनुकूल वातावरण असल्याची चर्चा राजकीय जाणकारांमध्ये सुरू आहे.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना चेअरमनपदाची संधी मिळाल्यास अक्कलकोट तालुक्याच्या राजकीय प्रतिष्ठेत भर पडेल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अक्कलकोटचा प्रभाव वाढण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. शेतकरी आणि सहकारी संस्थांच्या प्रश्नांवर त्यांना काम करण्याची मोठी संधी मिळू शकते.

चेअरमनपदाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

एकीकडे बँकेच्या निवडणुकीतील विजयाचे गणित, तर दुसरीकडे चेअरमनपदाची राजकीय रस्सीखेच, अशा दुहेरी चर्चांनी सोलापूरचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता डीसीसी बँकेच्या चेअरमनपदाच्या निर्णयाकडे लागले आहे. अखेर कोणाच्या गळ्यात चेअरमनपदाची माळ पडणार याकडे अक्कलकोट तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT