सोलापूर : मतदार यादी पुनरीक्षण अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात १ लाख ७० हजार ६९६ मतदार मृत आढळले आहेत. मृत मतदारांचे नाव वगळताना आता संबंधित मृत्यू प्रमाणपत्राची तपासणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
दरम्यान मतदार यादीत बदल अथवा नाव वगळण्याच्या प्रक्रियेत नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार असून, बल्कमध्ये अर्ज स्विकारण्यास आणि फॉर्म क्रमांक ७ व ८ चा गैरवापर टाळण्याच्या सक्त सूचनाही दिल्या आहेत. प्रारूप मतदार यादीवर प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी होणार आहे. सुनावणीच्या नोटिसा बजावताना उपलब्ध असलेल्या विविध माध्यमांचा प्रभावी वापर केला जाणार आहे. यात आवश्यकतेनुसार व्हॉट्सॲप संदेशाचाही वापर करून संबंधितांपर्यंत सूचना पोहोचविल्या जाणार आहेत.
व्हीआयपी मतदारांची यादी तपासणी
प्रत्येक मतदार नोंदणी अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील व्हीआयपी मतदारांची यादी प्राधान्याने तपासावी. एसआयआर अंतर्गत कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची तातडीने स्थापना करण्याचे निर्देशही निवडणूक आयोगाने दिले आहेत.
नवमतदारांसाठी ऑनलाईन अडचण
१८ ते १९ वर्षे वयोगटातील नवमतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी महाविद्यालयांना भेटी देऊन पात्र विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नोंदणी केली जाणार आहे. परंतू ऑनलाईन नोंदणी करताना अर्ज सबमिट होत नसल्याच्या तक्रारी आहेत.