सोलापूर : एलपीजी गॅसमध्ये मिश्रण करुन वापरता येणारे डायमिथाईल इथर (डीएमई) इंधनाचे भारतात पहिले उत्पादन सोलापुरात सुरु झाले आहे. बालाजी अमाईन्सच्या चिंचोळी एमआयडीसी येथील कंपनीत हा प्रकल्प कार्यन्वित झाला आहे. व्यावसायिक स्तरावर डीएमईचे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही भारतातील एकमेव कंपनी ठरली आहे.यामुळे सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
कंपीचे संचालक राम रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डायमिथाईल इथर हे इंधन एलपीजीमध्ये मिश्रण करून वापरता येणारे स्वच्छ व कार्यक्षम पर्यायी इंधन मानले जाते. अनेक पाश्चिमात्य व युरोपीय देशांमध्ये एलपीजीमध्ये 20 टक्क्यांपर्यंत डीएमईचे मिश्रण करून त्याचा वापर केला जातो. बालाजी अमाईन्सने सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी येथे हा प्रकल्प उभारण्या सुरुवात केली.
कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दरवर्षी एक लाख मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प उभारला असून डीएमईसाठी आवश्यक मूलभूत अभियांत्रिकी तंत्रज्ञान परदेशी कंपनीकडून प्राप्त करण्यात आले आहे. 20 मे 2026 रोजी व्यावसायिक स्वरुपात या प्रकल्पातून उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या बालाजी अमाईन्स एरोसोल उद्योग तसेच इतर व्यावसायिक क्षेत्रांमध्ये हीटिंगसाठी इंधन म्हणून डीएमईचा पुरवठा करणार आहे.
भारतामधील हा पहिलाच डीएमई उत्पादन प्रकल्प असल्यामुळे उत्पादन साठवण, हाताळणी, वापर, वाहतूक तसेच रोड टँकरद्वारे परिवहन यांसंदर्भातील पुरेशा भारतीय मानकांच्या अभावामुळे अनेक परवानग्या व वैधानकि मंजुरी मिळवण्यासाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागल्याचे रेड्डी यांनी सांगितले.